लिंबू अडीच पटीने वधारले, किराणा साहित्य मात्र स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:16+5:302021-08-23T04:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० ...

लिंबू अडीच पटीने वधारले, किराणा साहित्य मात्र स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव थेट ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. यासोबतच आल्याचेही भाव ४० रुपयांवरून ५० ते ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दुसरीकडे साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.
यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही अनेक दिवस पालेभाज्यांचे भाव कमी होते. मात्र, मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर भाववाढ झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने आवक चांगलीच वाढली व पालेभाज्यांचे भाव कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा पावसाला सुरुवात होऊन सर्वांना दिलासा मिळाला खरा, मात्र भाजीपाल्यातील भाववाढीने सर्वांची चिंता वाढविली आहे.
पावसामुळे एरव्ही पालेभाज्यांचे भाव अधिक वाढतात. मात्र, यावेळी तर भर पावसाळ्यात लिंबूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबू थेट ८० रुपये प्रति किलो झाल्याने ग्राहकांना चांगलीच झळ बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबूला मागणी कायम असल्याने भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
खाद्यतेलाचा दिलासा
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उचांकी गाठली होती. मात्र, सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहे. यामध्ये सोयाबीन तेल १५५, शेंगदाणा तेल- १७५, सूर्यफूल तेल १६०, पामतेल १३० रुपये प्रति किलो, तर तीळ तेल २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. किराणा साहित्यात साखरेत एक ते दोन रुपयांची वाढ होऊन ती ३७ ते ३८ रुपये प्रति किलोंवर असून, इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.
आले वधारले
पावसाळ्यामुळे चहामध्येदेखील आल्याचा मोठा वापर होऊन मागणी वाढते. त्यामुळे खाद्यपदार्थांसह चहासाठीही मागणी वाढल्याने आल्याचे भाव वधारले आहेत. ४० रुपयांवरून ते ५० ते ६० रुपये प्रति किलो झाले आहे. यासोबतच कोथिंबीरचे भावदेखील पुन्हा ६० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे, तर फूलकोबीचे भाव २० रुपयांवरून ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
हिरवी मिरची स्वस्त
पालेभाज्यांचे भाव वाढत असताना हिरवी मिरची, लाल टोमॅटो, भेंडी मात्र स्वस्त झाली आहे. यामध्ये हिरवी मिरची १५ ते २० रुपये प्रति किलोवर, तर टोमॅटो २० रुपये, भेंडी २० रुपये प्रति किलोवर आली आहे.
सध्या सर्वच किराणा साहित्यासह खाद्यतेलाचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे. भाजीपाल्यात काहीसी तेजी येत असल्याने भार वाढत आहे.
- विष्णू पवार, ग्राहक
किराणा साहित्यामध्ये साखर वगळता इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. विशेष म्हणजे खाद्यतेलही नियंत्रणात असून, फारशी ग्राहकी नाही.
- रमेश वाणी, व्यापारी
पावसामुळे पालेभाज्यांसह लिंबू, आल्याचेही भाव वाढले आहेत. मात्र, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी यांचे भाव कमी झाले आहे. इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत.
- सूरज चौधरी, भाजीपाला विक्रेते