बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन
By Admin | Updated: September 26, 2015 00:41 IST2015-09-26T00:41:38+5:302015-09-26T00:41:38+5:30
पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन
पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना अॅलोपॅथी पद्धतीने रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा डॉक्टर साक्री तालुक्यातील वार्सा गावी दवाखाना चालवत होता. साक्री पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिका:यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील परगना जिल्ह्यात असणा:या निलगंज येथील दीपकसिंग सुशांतसिंग राणा (वय 35) याने वार्सा गावात दवाखाना सुरू केलेला होता. मात्र, दीपकसिंग याच्याकडे अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करण्याचे कोणतेही मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नव्हते. तरीही तो स्वत:च्या फायद्यासाठी अवैधरित्या दवाखाना उघडून उपचारासाठी येणा:या रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करत होता. यासंदर्भात तक्रार आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम शरदचंद्र वानखेडे यांच्या पथकाने शुक्रवारी वार्सा येथे जाऊन दीपकसिंग याच्या दवाखान्यावर छापा घातला. पथकाने दवाखान्यातून अॅलोपॅथी औषधींचा साठा, इंजेक्शन, सिरींज, सलाईन, स्टेथोस्कोप असे साहित्य जप्त केले. यासंदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात डॉ.विक्रम वानखेडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 (1) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.