वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 16:32 IST2020-07-30T16:30:43+5:302020-07-30T16:32:25+5:30
साकेगाव रेल्वे पुलाखाली वाघूर पात्रात शेतकामासाठी जात असताना अचानक वाघूर धरणातून विसर्ग प्रवाहाचा लोंढा आल्याने यात सासू-सून वाहून गेले.

वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव रेल्वे पुलाखाली वाघूर पात्रात शेतकामासाठी जात असताना अचानक वाघूर धरणातून विसर्ग प्रवाहाचा लोंढा आल्याने यात सासू-सून वाहून गेले. धरण प्रशासनाने ग्रा.पं. प्रशासनास माहिती न दिल्याने गावात दवंडी दिली गेली नाही. यामुळे दोन निष्पाप महिलांना जीव गमवावा लागला. ही घटना ३० रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. महिनाभरातील ही वाघूर पात्रातील चौथी घटना आहे.
याबाबत माहिती अशी की, साकेगाव येथील अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या तुटक्या-फुटक्या भाड्याच्या घरात मुलगा वारल्यानंतर संसाराचा गाडा ओढण्यासाठी आई सिंधूबाई अशोक भोळे (६५) व पत्नी योगिता राजेंद्र भोळे (३५) या दोन महिला नेहमीप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेच्या नवीन पुलाखाली वाघूर पात्रातून शेत कामासाठी जात होते. अचानक या वेळेस वाघूर धरणाचा विसर्ग प्रवाह जलद गतीने सोडण्यात आला. यावेळी पुलावर काम करणारे रेल्वे कर्मचारी विशाल गणेश अनुसे यांनी पुलावरून मोठा प्रवाह येत असल्याचे बघताच त्यांनी खाली उभे असलेले सासू-सुनेला जोरात आरोळ्या मारून नदीच्या पात्राबाहेर जाण्यास सांगितले. मात्र पूल उंच असल्यामुळे कदाचित ते त्यांना ऐकू आले नसावे. मात्र प्रवाह येत असताना सासू-सुनेने जर तत्परता दाखवली असती (प्रवाह येत असल्याचे लक्षात आले असते तर) ते काठापर्यंत पोहोचू शकले असते. त्यांना प्रवाह आपल्या दिशेने जोरात येतोय याचा अंदाजच आला नाही व ते नदीत दगडावर जीव वाचविण्यासाठी उभे राहिले. मात्र प्रवाह मोठ्याने आल्याने त्यांचा स्वत:वरील नियंत्रण सुटले व ते प्रवाहाच्या ओघात वाहून गेले. स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांनी आरडा-ओरड केली. तसेच रेल्वे खांबाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळेस मोठा लोंढा आल्याने त्यांचे हात निसटले व ते बुचकड्या घेत प्रवाहात वाहून गेले.
दरम्यान, रेल्वे कर्मचारी विशाल यांनी त्वरित घटनेची खबर गावात दिली व अख्खे गाव घटनास्थळी जमा झाले. तब्बल दोन-अडीच किलोमीटर लांब साकेगाव व जोगलखेडा शिवाराजवळ चार तासानंतर सासू सिंधूबाई भोळे यांचा मृतदेह पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या हाती लागला. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गजानन राठोड, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विजय पोहेकर, विठ्ठल फुसे, जगदीश भोई हे तापी पात्रात पोहोचले. मोठ्या मुश्किलीने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.
वाघूर धरणातून ग्रा.पं. प्रशासनाला संदेश मिळालाच नाही
वाघूर धरणातून विसर्ग सोडण्याआधी सतर्कतेचा इशारा म्हणून धरण प्रशासनाकडून ग्रा.पं. व महसूल विभागास पत्र देण्यात येते. त्या अनुषंगाने गावांमध्ये दवंडी देऊन लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. मात्र वाघूर धरण प्रशासनाने गावात धरणातून विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती ग्रा. पं. प्रशासनाला माहिती दिलीच नसल्याचे सरपंच अनिल पाटील यांचे म्हणणे आहे तर अभियंत्यांनी फोन केला असल्याचे सांगितल,े मात्र निष्काळजीमुळे दोन निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागला. गावात दवंडी देवून नागरिकांना जागृत केले असते तर दोघांचे जीव वाचले असते अशी चर्चा आहे.
वाळू ठेकेदार नदीपात्रात मजुरांकडून गाळतात वाळू
गावातील बिना लिलाव कथित ठेकेदार भल्या पहाटे व रात्रीच्या वेळेस गोरगरिबांना काम तर देतात मात्र त्यांची पिळवणूक करून वाघूर पात्रात वाळू गाळण्याचे सांगतात. यामुळे मजुरांना वाघूर पात्रात आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.अनेक वेळा पावसाळ्यात धरणातून प्रवाह सोडणार येतो मात्र ज्यांना पोहता येते ते आपला जीव वाचवतात व ज्यांना होता येत नाही साहजिकच जीव गमवावा लागतो. याबाबत जिल्हाधिकार्ी अभिजित राऊत, प्रांत रामसिंग सुलाने व तहसीलदार दीपक धिवरे यांनी जातीने लक्ष घालून जर हा प्रकार होत असेल तर अशा लोकांवर वचक बसवावाश अशी संतप्त प्रतिक्रिया गावातून उमटत आहे
महिन्यातील चौथी घटना
३० जून रोजी वाघूर पात्रात फिरोज देशमुख हा युवक बुडून वारला. त्याचा मृत्यूदेह तब्बल दोन दिवसांनी हाती लागला होता. या घटनेनंतर ७ जुलै रोजी महामार्ग कर्मचारी बाबूलाल पंडित यास वाघूरच्या प्रवाहात सिमेंटच्या पाईपात अडकून आपला जीव गमवावे लागला होता. १५ जुलै रोजी जेताराम बारेला व सीताराम बारेला हे दोघे खेकडे पकडण्यासाठी आले होते. गावाजवळील तापी पात्रात हतनूर धरणातून विसर्ग सोडण्यात आल्यामुळे अडकले होते. त्यांना ग्रामस्थांनी सतर्कतेने त्यांचे जीव वाचवले होते व त्यानंतर आज या दोन महिलांना आपले जीव गमवावे लागले. महिनाभरात ही चौथी घटना असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, योगिता भोळे या महिलेस एक सातवीत शिकणारी मुलगी हेमांगी व पुणे येथे कमी वयात काकांसोबत घराची परिस्थिती बघून काम करणारा देवरथ असे दोन अपत्य आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या या कुटुंबियांना शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनकडून व्यक्त करण्यात येत आहे.