नगरपालिकांसाठी इच्छुकांसह नेत्यांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:03+5:302021-09-05T04:21:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा सर्वपक्षीय निर्णय झाला असला तरी ...

Leaders with aspirations for municipalities look to Election Commission decision | नगरपालिकांसाठी इच्छुकांसह नेत्यांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे

नगरपालिकांसाठी इच्छुकांसह नेत्यांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा सर्वपक्षीय निर्णय झाला असला तरी जिल्ह्यातील १६ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या विषयी निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे संबंधित नगरपालिकांसाठी इच्छुकांच्या तसेच जिल्हाध्यक्षांच्याही नजरा लागल्या आहेत. दरम्यान, सर्वपक्षीय निर्णयाचे जिल्हाध्यक्षांकडून स्वागत केले जात असून त्यास त्यांनी पाठिंबादेखील दिला आहे.

जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या भडगाव, वरणगाव नगरपरिषद तसेच नोव्हेंबर २०२१ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या नगरपरिषदांसह नव्याने घोषित झालेल्या नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १६ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया यानिमित्ताने सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम असल्याने या साठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले व हे आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकीकडे नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात व दुसरीकडे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय यामुळे जिल्ह्यातील १६ नगरपालिकांच्या निवडणुकीविषयी नेमका काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

कोरोनामुळे रखडल्या होत्या निवडणुका

कार्यकाळ संपलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या वर्षापासून रखडल्या होत्या. आता संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या व या निवडणुकांविषयी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणूक प्रक्रियेविषयी कळविले आहे.

जिल्ह्यातील या न.पा.ची निवडणूक

भडगाव, वरणगाव, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, बोदवड, पाचोरा, नशिराबाद. निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार २३ ऑगस्टपासून या नगरपालिकांचा प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Leaders with aspirations for municipalities look to Election Commission decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.