भडगावच्या जवानास अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:29+5:302021-07-14T04:20:29+5:30
भडगाव : शहरातील टोणगाव भागातील शहीद जवान नीलेश रामभाऊ सोनवणे यांच्यावर गिरणा नदीच्या पात्रात शासकीय इतमामात मंगळवारी दुपारी ...

भडगावच्या जवानास अखेरचा निरोप
भडगाव : शहरातील टोणगाव भागातील शहीद जवान नीलेश रामभाऊ सोनवणे यांच्यावर गिरणा नदीच्या पात्रात शासकीय इतमामात मंगळवारी दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शहीद जवान नीलेश सोनवणे यांना त्यांच्या चौघा भावंडांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात मुखाग्नी दिला. शहीद जवान नीलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भडगाव तालुका परिसरातील तरुण, रजेवर घरी आलेले सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, शहरातील नागरिक, महिला वर्ग, लोकप्रतिनिधी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीलेश रामभाऊ सोनवणे (३०) हा जवान भारतीय सैन्यात महार रेजिमेंटमध्ये होता. दहा जुलै रोजी काश्मीरमधील लेह लडाख येथे सेवा बजावत असताना तो शहीद झाला होता. त्यांचे पार्थिव लष्कराचे अधिकारी आणि जवानांनी मंगळवारी १३ रोजी सकाळी ९-३० वाजताच्या सुमारास भडगाव येथे आणले. अंत्यदर्शन घेताना आई लयाबाई सोनवणे यांच्यासह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
टोणगाव येथील निवास्थाहून त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. भुसावळ आर्मी आर्डिनन्स कोअर, सीओआरपीएस कोअर तसेच भडगाव पोलिसांनी मानवंदना दिली. यावेळी आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी विकास नवाळे, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील माजी नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, शिवसेना शहर प्रमुख योगेश गंजे, ईम्रानअली सैय्यद, माजी नगरसेविका योजना पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, महेंद्र ततार, प्रहार संघटनेचे विजयकुमार भोसले, जाकीर कुरेशी, सुरेंद्र मोरे, आण्णा मोरे, नीलेश मालपुरे, खान्देशी रक्षक संस्थेचे जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
शहरात रस्त्यांवर रांगोळ्या काढून सजावट केली होती. अंत्ययात्रेदरम्यान वीर जवान तुझे सलाम, वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
शिवनेरी फाऊंडेशनची श्रद्धांजली
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी शहीद जवान नीलेश सोनवणे यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट दिली. फाउंडेशनच्या टीमने संपूर्ण परिसरात देशभक्तीपर रांगोळी काढून आदरांजली अर्पण केली. यावेळी भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, दिशांत सूर्यवंशी, हेमसागर पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या कावेरी पाटील, योजना पाटील, मयूर घोरपडे, धीरज पवार, सम्राट सोनवणे, यश चिंचोले आदी उपस्थित होते.
१४ व्हीडीटी ०७
भडगाव येथे शहीद नीलेश सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना त्यांचे बंधू.