गत १० वर्षात वाचवले २० ते २५ जणांचे प्राण तर तेवढीच काढली बुडालेली प्रेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:42+5:302021-08-22T04:18:42+5:30
मुक्ताईनगर : निसर्ग म्हटला म्हणजे त्यात नदी, नाले, ओढे, डोंगर-दऱ्या यासारखे महत्त्वपूर्ण घटक हे ओघाने आलेच. परंतु या घटकांमुळे ...

गत १० वर्षात वाचवले २० ते २५ जणांचे प्राण तर तेवढीच काढली बुडालेली प्रेते
मुक्ताईनगर : निसर्ग म्हटला म्हणजे त्यात नदी, नाले, ओढे, डोंगर-दऱ्या यासारखे महत्त्वपूर्ण घटक हे ओघाने आलेच. परंतु या घटकांमुळे अनेक वेळेस विविध दुर्घटनादेखील होत असतात किंवा जीवनाला कंटाळून अथवा नैराश्य येऊन जीवन संपवण्यासारखे प्रकारदेखील अनेक वेळेस घडत असतात. याच घटनांमधून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करणे हा हेतू समोर ठेवून संघटना स्थापन करण्याचा आदर्श कसा जोपासावा यासाठी सुंदर उदाहरण म्हणजे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील तापी पूर्णा चालक-मालक नावाडी संघटना होय.
चांगदेव येथे तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम असल्याने विस्तीर्ण असा जलाशय आहे. त्यामुळे अनेक वेळेस या ठिकाणी भाविक देवदर्शनासाठी तसेच अस्थी विसर्जन किंवा पर्यटन म्हणून येत असतात. पर्यटकांची कायम असलेली गर्दी व त्यातच तरुणाईमध्ये असलेली हुल्लडबाजी यातून बऱ्याच वेळेस दुर्घटना होत असतात. ही बाब लक्षात आल्याने चांगदेव येथे नावाडी व्यवसाय करणाऱ्या युवकांनी मिळून एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेला तापी-पूर्णा चालक-मालक नावाडी संघटना असे नाव दिले. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचा उद्देशच बुडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रेत बाहेर काढणे या उद्देशाने प्रेरित होऊन राजेंद्र अंबादास भोई यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन केली. या संघटनेत हिरामण मोतीराम भोई हे उपाध्यक्ष असून संजय शिवलाल भोई हे सचिव आहेत, तर ज्ञानेश्वर सदू भोई, किशोर ज्ञानेश्वर भोई, प्रकाश देवराम भोई, विलास शिवदास भोई, गजानन शिवदास भोई, योगेश राजेंद्र भोई, राजेंद्र शिवराम भाई, मनोज हिरामण भोई, गोपाळ त्र्यंबक भोई, जयराम देवराम भोई, प्रकाश देवराम भोई, गोपाळ प्रकाश भोई, प्रवीण परदेशी, प्रवीण ज्ञानेश्वर भोई आणि विजय शिवराम भोई या १८ युवकांची ही समिती बनवण्यात आली आहे.
२०१५ पासून आतापर्यंत या तरुणांनी जवळपास २० ते २५ जणांना जलसमाधी मिळण्यापासून वाचवले आहे. यामध्ये काही जण हे दुर्घटनेतून पाण्यात पडले होते, तर काही जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच १५ ते २० जणांची प्रेतेदेखील बुडाल्यानंतर तापी नदीतून काढलेली आहेत. यात नुकतेच मेहुण येथे तापी नदीच्या पात्रात बाळकृष्ण तुळशीराम पाटील हे बोदवड तालुक्यातील व्यक्ती असून, ७ ऑगस्ट रोजी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे प्रेत त्यांनी पाण्यातून बाहेर काढले होते. या युवकांचे कार्यक्षेत्र पूर्ण नदीच्या खामखेडा पुलापासून ते हतनूर धरणापर्यंतचे आहे. विशेष म्हणजे या व्यतिरिक्त एकादशी चांगदेव यात्रा उत्सव या दरम्यान फराळ वाटप करण्यासारखेच सामाजिक उपक्रमदेखील हे तरुण करत असतात.
जीव वाचवण्याचा व प्रयत्न करण्याचे सामाजिक उपक्रम आणि पवित्र कार्य करत असताना मात्र कोणत्याही फळाची अपेक्षा या नावाडी संघटनेकडून व्यक्त केली जात नाही. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला २०१८ मध्ये पोलीस निरीक्षक अशोक कडलग असताना या युवकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेला प्रमाणपत्र दिले होते. मात्र याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने अशा युवकांची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देणे किंवा किमान मानधन देणे यासारख्या गोष्टीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांची मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुरस्कार अथवा मानधन दिल्यास ती एकप्रकारे युवकांना प्रेरणा मिळू शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे.