‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:46 AM2020-02-24T01:46:36+5:302020-02-24T01:46:56+5:30

भाषेचा वावर, वापर आणि व्याप्ती कशी रंजक असते यासंदर्भात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत उदाहरणांसह खुसखुशीत लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे...

'Language fluency, usage and color coverage' | ‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’

‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’

Next

भाषेचा वावर, वापर आणि भाषिक बदल यासंदर्भात अनेक भाषा विद्वतांनी वेळावेळी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणं आणि संशोधनं केली आहेत. मग ती भाषा प्रमाण असो वा बोली असो. या गोष्टीचा भाषेला अन् भाषा प्रेमींना फायदाच झालाय. परंतु अलीकडे काही भूभागात भाषा वापरात विशेष करून विशेषणांच्या, वाक्प्रचारांच्या बाबतीतला वापर आणि वावर बऱ्यापैकी वाढत चाललाय. ही बाब भाषिक समृद्धीसाठी स्वागतार्हच आहे. अर्थात हा बदल कोणी केला हे सांगणे अशक्यप्राय असले तरी नव्याने ते ऐकणाºयाला रंजक आणि तितकेच आकर्षकही वाटते.
परवाची एक ताजी घटना, मी अमळनेर येथे मराठा महिला संघात व्याख्यानासाठी जात होतो. माझा भाचा सोबत होता. भाच्याचा पाच वर्षाचा मुलगा आमचे सोबत येण्याकरिता हट्टाला पेटला. पाय आपटायला लागला अन् भोकांडही पसरू लागला. त्याच्या या कृतीनं भाचा त्याच्या खास शैलीत मुलाला म्हटला, ‘येच्या गोया संपल्याहे येच्याकडे पहानं पडीन’ ‘गोया संपल्या म्हणजे नेमकं काय’ हा प्रतिप्रश्न मी भाच्याला केला. एवढ्या संतापातही भाचा हसून म्हणाला, यापूर्वी दिलेला चोप विसरलाय, नव्याने द्यावा लागले. नव्याने वाक्प्रचाराची बोलीभाषेत होणारी ही रुजवात मला अवाक करीत लिहितं करून गेली.
या प्रसंगामुळे मागे केव्हा तरी ऐकलेलं भांडण आठवलं. बाजारात दोन जण मोठमोठ्यानं भांडत होते. त्या भांडणात तिसरा आला. अंगापिंडानं थोराड, कपड्या लत्त्यावरुन प्रतिष्ठित मोठ्या करुड्या आवाजात म्हटला, ‘काय एकमेकाची शाळा घेताय’ ‘तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा’ या त्याच्या दोन्ही वाक्प्रचारांनी माझं लक्षच वेधून घेतलं. ‘शाळा घेणे’, ‘कार्यक्रम झाला’ म्हणणे हे वाक्प्रचार पारंपरिक व मूळारंभी निश्चितच नाहीत. हा कालगरजेचा परिपाक म्हणू या, की भाषिक परिवर्तनाची हाक, काही का असेना ही भाषिक अवकाश वृद्धी वा व्याप्ती म्हणून या वाक्प्रचारांकडे पाहताना मनोमन आनंदाची पेरणी बाकी निश्चित झाली.
आणखी एका गोष्टीची नवलाई प्रस्तुत प्रसंगी सांगणेही मला अगत्याचे वाटते. प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात वावरताना विद्यार्थ्यांमध्ये ‘भासा’ हा शब्दप्रयोग एकमेकांना उद्देशून उच्चारला जाताना दिसून येतो. ‘भासा’ हा शब्द ‘भाचा’ या शब्दाचं बोलीरुप आहे. भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा. खरं म्हणजे या दोन्ही बोलणाऱ्यांमध्ये कुणीही बहिणीचा मुलगा नाही. एवढंच काय एकदा तर चक्क एका प्राध्यापक महोदयांनी ‘वो भासा इकडे ये’ अशी हाक एका विद्यार्थ्याला दिली. मला सांगा या बदलास काय म्हणावे. कोणते नाव द्यावे. माझा हा गुंता एका विद्वत मित्राजवळ बोलायला गेलो तर त्याने सर्वात आघाडी घेत यावर जणू कमान उभारली अन् म्हटला, हो न यार वाना ‘माझे तर इंडीकेटरच लागतात’ असं हे ऐकून माझा गुंता तर त्या विद्वत मित्राने सोडवलाच नाही. पण एक नवा वाक्प्रचार त्याने दिल्याचा मला मात्र मनापासून आनंद झाला.
- प्रा.वा.ना.आंधळे, साहित्यिक, धरणगाव, जि.जळगाव

Web Title: 'Language fluency, usage and color coverage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.