जामनेरात जमीन घेतली, पण लिलावात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:28+5:302020-12-04T04:45:28+5:30
जळगाव : जामनेर तालुक्यात आपण जमीन घेतली आहे, परंतु ती लिलावात घेतली आहे. त्याचा बीएचआर प्रकरणाशी संबंध जोडणे चुकीचे ...

जामनेरात जमीन घेतली, पण लिलावात नाही
जळगाव : जामनेर तालुक्यात आपण जमीन घेतली आहे, परंतु ती लिलावात घेतली आहे. त्याचा बीएचआर प्रकरणाशी संबंध जोडणे चुकीचे असून त्याच्याशी आपला संबंध नाही, पोलीस चौकशीत सत्य काय ते उघड होईलच, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात फत्तेपूर, शहापूर रस्त्यावर सहा एकर शेतजमीन घेतली व त्याच्या खाते उताऱ्यावर गिरीश महाजन, पत्नी साधना महाजन यांचे नावे आहेत. तसेच नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल भावात शेत जमीन घेतल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला होता. या जमिनीचा व्यवहार नियमानुसार व रितसर झाला असून पुणे येथील उद्योजकाने साडे तीन वर्षापूर्वी ही जमीन खरेदी केली होती. आता चार महिन्यापूर्वी कोरोनाच्या महामारीत आर्थिक अडचण आल्याने त्यांनी ही जमीन विक्रीस काढली व ती जमीन आपण खरेदी केलेली आहे. स्वत: तसेच पत्नीच्या नावावर ही जमीन आहे. व्यवहार झाल्यानंतर ज्याच्याकडून जमीन घेतली, त्यांना बँकेतून धनादेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सारा व्यवहार नियमात व कायदेशीर आहे, यात गैरव्यवहाराचा संबंधच नाही? असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
बीएचआरशी संबंधच नाही
बीएचआर प्रकरणात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात धाडसत्र राबविले. त्यात गिरीश महाजन समर्थक सुनील झंवर याच्यासह अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. याचे धागेदोरे गिरीश महाजन यांच्यापर्यंत असल्याचा आरोप ललवाणी यांनी करुन याबाबतचे सर्व कागदपत्रे पुण्यात जावून पोलिसांकडे सादर केल्याचे ललवाणी यांनी सांगितले. त्यावर महाजन यांनी बीएचआर प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, पोलीस चौकशीत सत्य काय ते बाहेर येईलच असेही ते म्हणाले.