अनलॉकनंतर लालपरीची साडेपाच कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:07+5:302021-06-22T04:12:07+5:30
जळगाव : कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, रेल्वेप्रमाणे बसलाही प्रवाशांची संख्या वाढली आहे. ७ जूनपासून ...

अनलॉकनंतर लालपरीची साडेपाच कोटींची कमाई
जळगाव : कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, रेल्वेप्रमाणे बसलाही प्रवाशांची संख्या वाढली आहे. ७ जूनपासून लॉकडाऊन उठविल्यानंतर पंधरा दिवसांत एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने सुमारे साडेपाच कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. सध्या दिवसाला जळगाव विभागाला ४० ते ५० लाखांच्या घरात उत्पन्न मिळत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या महिन्यात १ मेपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, शासनाने ७ जूनपासून अनलाॅक केल्याने महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे पूर्वीप्रमाणे सर्व मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच बसमधील ५० टक्के प्रवासी क्षमतेची अटही रद्द केल्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे.
त्यामुळे जिल्ह्यांतर्गत व नाशिक, औरंगाबाद, धुळे, पुणे, मुंबई, सोलापूर, अकोला, माहुरगड, लातूर या मार्गांवरही बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होऊन दररोज ४० ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. ७ ते २० जूनपर्यंत ५ कोटी २८ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, २१ जूनच्या रात्रीपर्यंतचे उत्पन्न मिळून पावणेसहा कोटींच्या घरात हा आकडा पोहोचणार असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अनलॉकनंतर जळगाव विभागातर्फे ७० टक्के फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत साडेपाच कोटींच्या घरात जळगाव विभागाला उत्पन्न मिळाले आहे. लवकरच १०० टक्के फेऱ्या पूर्ववत करण्यात येणार असून, यामुळे उत्पन्नातही वाढ होणार आहे.
- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग