विषारी जलपर्णीने वेढला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:45+5:302021-09-24T04:18:45+5:30

बोदवड : संपूर्ण शहरातील विहिरींच्या पाण्याची पातळी तसेच शहरातील पाळीव जनावरांना व उन्हाळ्यात म्हशींसाठी उपयोगी ठरत असलेला बोदवड शहराच्या ...

Lake surrounded by poisonous water hyacinth | विषारी जलपर्णीने वेढला तलाव

विषारी जलपर्णीने वेढला तलाव

बोदवड : संपूर्ण शहरातील विहिरींच्या पाण्याची पातळी तसेच शहरातील पाळीव जनावरांना व उन्हाळ्यात म्हशींसाठी उपयोगी ठरत असलेला बोदवड शहराच्या मध्यभागी असलेल्या हिरवा तलावाला विषारी जलपर्णीने पूर्णपणे वेढले आहे. त्यामुळे तलावामधील जलचरांचे जीवनही संकटात सापडले आहे.

बोदवड शहरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी राखण्यास महत्त्वपूर्ण ठरणारा तसेच शहरातील पाळीव जनावरांना पिण्याच्या पाण्याचे व उन्हाळ्याच्या काळात म्हशींना बसण्यासाठी आधार असलेला बोदवडचा हिरवा तलाव प्रसिद्ध आहे. हा तलाव जिल्हा जलसंधारण उपविभाग, मुक्ताईनगरच्या मालकीचा आहे. यंदाच्या पावसाने तलावाला ८० टक्के पाणी आले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे, तर याच तलावात मासेमारीसाठी लिलाव करून लाखो रुपयांचा लाभ लघु सिंचन विभागाला होतोच. शिवाय या पाण्याच्या सिंचनामुळे शहरातील विहिरींना वर्षभर पाणी टिकते.

गत दोन वर्षांपासून या तलावात विषारी जलपर्णी पसरली असून, तलावातील पाणी दिसेनासे झाले आहे. या तलावाच्या दुरुस्ती व सौंदर्यीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही या तलावाचे भाग्य काही बदलले नाही. या मंजूर निधीत तलाव सुशोभिकरण करून, मॉर्निंग ट्रॅक करणे, तलावावर वृक्षारोपण करणे आदी कामांसाठी ठेकाही दिला आहे, परंतु काम सुरू झालेले नाही.

याबाबत जलसंधारणच्या मुक्ताईनगर उपविभागाचे शाखा अभियंता एम. कोकाटे यांची प्रतिक्रिया घेतली असता, या तलावाची देखरेख नगर पंचायतीच्या अखत्यारित असून, हा तलाव महसूलच्या जागेत असल्याने त्याचे हस्तांतरण नगरपंचायतीकडे झालेले आहे. आमच्या विभागाकडे दुरुस्तीच्या निधीमार्फत काम करण्यासाठी आला होता. परंतु, हा निधी परत गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर नगर पंचायतीने या तलावातील जलपर्णी काढण्याचा ठेका दोन वर्षांपूर्वीच दिला होता. परंतु, हे काम व्यवस्थित न झाल्याने जलपर्णी तशीच आहे.

Web Title: Lake surrounded by poisonous water hyacinth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.