कोविडमुळे अनाथ बालकांचे ‘संगोपन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST2021-09-16T04:20:55+5:302021-09-16T04:20:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडच्या दुसऱ्या लाटेने जिल्हाभरात हाहाकार माजविला होता. या काळात जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त ...

कोविडमुळे अनाथ बालकांचे ‘संगोपन’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या दुसऱ्या लाटेने जिल्हाभरात हाहाकार माजविला होता. या काळात जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त बालकांनी आपले एक पालक, तर २० बालकांनी आपले दोन्ही पालक कोविडमुळे गमावले. या सर्व बालकांना बालसंगोपनाचा लाभ मिळत आहे, तर त्यासोबतच आणखीही काही योजना प्रस्तावित असून, त्यांचाही लाभ लवकरच मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी दिली.
जिल्हाभरात मार्च ते मे या काळात कोविडमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. त्याच काळात अनेकांनी आपले आई किंवा वडील गमावले, तर २० बालकांनी दोन्ही पालकांना गमावले. कोविडमुळे उद्ध्वस्त झालेल्या या संसारांना शासनाने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हाभरात कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांची ६२० प्रकरणे समोर आली होती. त्या सर्वांना मदत दिली जात आहे. या मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक खर्चासाठीदेखील मदत केली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभाग या शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधणार असल्याची माहितीदेखील विजयसिंग परदेशी यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थादेखील या कामात पुढे येत आहेत. या संस्था अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य, तसेच इतर प्रकारची मदत करणार आहेत.
दोन्ही पालक गमावलेले २०
एक पालक गमावलेले ६००
काय मिळणार लाभ
- दोन्ही पालक गमावलेल्यांना दरमहा बालसंगोपन योजनेतून ११०० रुपये बँक खात्यात मिळणार.
- दोन्ही पालक गमावलेल्यांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांचे बँकेत फिक्स डिपॉझिट मिळणार. त्यांना वयाच्या २१ व्या वर्षी ही रक्कम मिळेल, तसेच पी.एम. केअर फंडातून दहा लाख रुपयांची रक्कम बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात मिळणार आहे. त्यासोबतच शासनाच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल.
- एक पालक गमावलेल्यांना दरमहा बालसंगोपन योजनेतून ११०० रुपये बँक खात्यात मिळतील, तसेच त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयातील फीसंदर्भातदेखील शासन काळजी घेणार आहे.
- जिल्ह्यातील विविध एनजीओ कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.