स्वयंपाकीण ते स्वत:ची खाणावळ
By Admin | Updated: May 14, 2017 19:27 IST2017-05-14T19:27:46+5:302017-05-14T19:27:46+5:30
पाचोरा येथील मंगल मधुकर कुलकर्णी यांची संघर्ष कहाणीही रोचक आहे.

स्वयंपाकीण ते स्वत:ची खाणावळ
ऑनलाइन लोकमत
पाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - स्वयंपाकीणपासून कष्ट करीत स्वत: खाणावळ मालक बनलेल्या पाचोरा येथील मंगल मधुकर कुलकर्णी यांची संघर्ष कहाणीही रोचक आहे.
मातृदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता समजले की, या उंचीवर पोहोचण्यासाठी याआधी त्यांनी संघर्ष केला. त्यांचे पती मधुकर दत्तात्रय कुलकर्णी केवळ 300 रुपयांच्या पगारावर एका खासगी कंपनीत कार्यरत होते. पदरी चार मुलं होती. कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी मंगल कुळकर्णी यांनी घराबाहेर पाऊल टाकत स्वाभिमानानं काही ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम स्वीकारलं. हाताला अन्नपूर्णेचं वरदान लाभलं होतं. दोन घरं वाढली. पापड लाटण्याचं कामसुद्धा त्यांनी स्वीकारलं. घराला मदत होत होती, पण पुन्हा अडचणी समोर उभ्या करून नियती जणू त्यांची परीक्षा घेत होती. त्यांच्या मुलाला योगेशला वयाच्या पंधराव्या वर्षी अपंगत्व आलं. पतीचं आजारपण, ऑपरेशन अशा अनेक समस्या समोर आल्या. पण मंगलाताईंनी न डगमगता त्यांना सामोरे जाणे पसंत केलं.
पती पूर्ण बरे झाले तर मुलगा आपल्या पायांवर उभा राहू शकेल एवढा सक्षम झाला, आणि 1982 मध्ये दोन मेंबर्स असलेलं पाचोरा शहरातील पहिलं घरगुती भोजनालय सुरू झालं पण या क्षेत्रात आपण पूर्ण यशस्वी होऊ हा आत्मविश्वास मंगलाताईंना होता आणि त्याच्याच बळावर त्यांनी आपल्या चारही मुलांची शिक्षणं पूर्ण केली. आज त्यांचा मोठा मुलगा बँकेत मोठय़ा पदावर कार्य करतोय तर तीन मुलं त्यांचा भोजनालयाचा व्यवसाय सांभाळताय. आज या भोजनालयाच्या शहरात दोन शाखा निर्माण झाल्या आहेत. आज चारही मुलांची लगAं झाली आहेत. सुना आणि नातवंडांसह 16 जणांचा परिवार आहे. या भोजनालयात भोजनासाठी येणा:या प्रत्येक सदस्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानणा:या मंगलाताईंना पूर्वीचा संघर्ष आठवला की आजही गहिवरून येतं.