खरिपाचा झाला घात पण शासन देईना साथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:49+5:302021-09-23T04:18:49+5:30
भडगाव तालुक्यात २० ते २३ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात हजारो हेक्टरवरील केळी, लिंबू फळबागा ...

खरिपाचा झाला घात पण शासन देईना साथ!
भडगाव तालुक्यात २० ते २३ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात हजारो हेक्टरवरील केळी, लिंबू फळबागा व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. वरील नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्गात शासनाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. आता तरी शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे. तसेच भडगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या व वेळोवेळी झालेल्या सततच्या पावसाचे पाणी शेतात साचल्याने हुकमी उत्पन्न देणारे कपाशीचे पीक उत्पन्नाला मारक ठरताना दिसत आहे. बागायती कापसाचे परिपक्व बोंड काळे पडून नुकसान होताना दिसत आहे. कपाशी पिकाची पाने पिवळी पडून झाडे बसताना दिसत आहेत. कपाशीचे पिकाचे उत्पन्न निम्म्यावर घटल्याचे चित्र आहे. कपाशी पिकावर केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे भडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.