श्रावणातील सर्वदूर अमृतधारांनी खरीप हंगामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:21+5:302021-08-19T04:22:21+5:30

जळगाव : तब्बल एक महिन्याचा खंड, पुष्य, आश्लेषा ही हमीच्या पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. श्रावणाच्या सुरुवातीलाच बसू ...

The kharif season is revived by nectar streams all over Shravan | श्रावणातील सर्वदूर अमृतधारांनी खरीप हंगामाला संजीवनी

श्रावणातील सर्वदूर अमृतधारांनी खरीप हंगामाला संजीवनी

जळगाव : तब्बल एक महिन्याचा खंड, पुष्य, आश्लेषा ही हमीच्या पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. श्रावणाच्या सुरुवातीलाच बसू लागलेला उन्हाचा तडाखा यामुळे ऐन फुलोरा ते पक्वतेच्या अवस्थेत खरिपातील सर्वच पिके माना टाकत करपू लागली होती. मंगळवारी मघा नक्षत्र लागले अन् त्याच रात्रीपासून रिमझिम श्रावणसरी बरसल्या. खरीप हंगाम वाया जाता जाता वाचला खरा; पण सरासरी उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

या पावसाचा प्रामुख्याने कपाशी पिकालाच अधिक लाभ होणार आहे. मका, बाजरी या पिकांना जो बसावयाचा तो फटका बसलाच आहे. काही क्षेत्रावरील उडीद, मूग, सोयाबीनमध्ये फुलगळ झाली आहे. आता काही क्षेत्रावर या पिकात शेंगा पक्वतेकडे आहेत. पावसाचे वातावरण राहिल्यास यात नुकसान संभवते. पूर्वहंगामी कापसात पक्व कैऱ्यासडची धास्ती आहेच.

चाळीसगावला भिजपावसाने पिकांना बूस्टर

चाळीसगावः गत तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे मंगळवारी कमबॅक झाले. बुधवारीही संततधार कायम होती. भिजपावसामुळे ८६ हजार हेक्टरवरील पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मंगळवारी पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

चौकट

पाणी टंचाईचे सावट

पावसाचे कमबॅक झाले असले तरी, मध्यम प्रकल्प कोरडेठाक असून दमदार व वाहून निघणाऱ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विहिरींची जलपातळी खालावल्याने बागायती पिकांना देखील दमदार पावसाची गरज आहे. गत वर्षापेक्षा यंदा पावसाची सरासरी कमी असून, अशीच स्थिती राहिल्यास पाणीबाणी निर्माण होऊ शकते. गिरणा धरणात ४० तर मन्याडमध्ये २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील १४ मध्य जल प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आहे.

अमळनेर : एकाच दिवसात

सरासरी ७० मिमी पाऊस !

तब्बल दीड महिन्यानंतर अमळनेर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. २४ तासात सरासरी ७० मिमी पाऊस पडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दिवसा काळ्याकुट्ट ढगांनी अंधारलेले वातावरण होते व ढग गडगडल्याचा आवाज कानी पडला. दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर पाऊस सुरू होता.

हंगामावर परिणाम होणार

रावेर : बुधवारी रात्री व गुरुवारी पूर्वरात्री तथा पहाटेसुद्धा दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. आज मितीस खरिपाच्या हंगामाला नवसंजीवनी लाभली असली तरी, तब्बल महिनाभरापासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने फल व फूलधारणेच्या अवस्थेत असलेल्या खरिपाच्या हंगामाला असह्य ताण बसला असून, खरिपाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊन आजच्या पावसाची नवसंजीवनी मिळाली असली तरी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नदी, नाले, तलाव कोरडेच

खेडगाव ता. भडगाव : या खरिपात सुरुवातीला मे-जून महिन्यात कुठे-कुठे पाऊस झाला. सर्वत्र तो एकसारखा बरसला नाही. हंगाम एकसमान नाही. यानंतर जूनमध्ये प्रथम खंड पडला. पुन्हा जुलैच्या सुरुवातीला पुनर्वसू नक्षत्रात पावसाचे पुनरागमन होत हंगामाचे पुनर्वसन झाले. हा पाऊसही सर्वदूर नव्हता. १५, १८ जुलैपर्यंत तो आज इथे, उद्या तिथे असा झाला. पुन्हा एक महिन्याच्या खंडानंतर तो काल-परवा बरसता झाला.

या पावसाळ्यात श्रावण सरींच्या रूपात प्रथमच सर्वदूर व सार्वत्रिक पाऊस बरसला हे येथे विशेष होय. अजूनही गिरणा नदी व इतरही नदी-नाले, तलाव कोरडे असल्याने एक-दोन जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

एकूणच काहीसा तारक, काहीसा मारक असा मघा नक्षत्रातील पाऊस राहणार आहे.

फोटो: कधी नव्हे ते ऐन श्रावणात नदी-नाल्यांची वाहती धार, गिरणा नदीतील पाण्याचे डोह हे असे आटले आहेत. आता श्रावण सरी मुसळधार बरसण्याची गरज आहे.

भिजपावसाने

जमीन झाली रेलचेल

आडगाव/वाघडू, ता. चाळीसगाव : रात्रभर व बुधवार दुपारपासून भिजपावसाने जमीन रेलचेल झाली, त्यामुळे गेल्या एक-दीड महिन्यापासून पावसाविना व्याकूळ झालेल्या कपाशी व मका पिकाला एकप्रकारे बूस्टर डोस मिळाला. भिजपाऊस पडत असल्याने शेताबाहेर पाणी निघाले नाही. दडक्या पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.

आशा पल्लवित उडीद, मूग दाणा भराईवर

बोदवड : मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकरी राजाचा जीव भांड्यात पडला आहे. हातात असलेला घास हिरावण्याची शक्यता असताना ऐनवेळी पावसाने धीर देत दिलासा दिला.

गेल्या काही दिवसांपासून ऊन खात असलेला मका या पाण्याने तगला तसेच कपाशीही तरारली तर दाणे भराईवर आलेला उडीद व मूग काहीअंशी मार खाण्याची स्थिती आहे. परंतु, पावसाने इतर पिके मात्र वाचणार आहेत. बोदवड परिमंडळमध्ये ३८, नाडगाव २५, करंजी २६ असा एकूण ५९ मिमी पाऊस झाला.

पारोळ्यात दिवसभर रिपरिप

पारोळा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. बुधवारी संततधार पावसाने रात्रीपासून संपूर्ण दिवसभर सुरू होता. दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. या रिपरिप पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बोरी, म्हसवे, भोकरबारी, इंदासी, कंकराज, या धरणातील पाणी पातळी काहीअंशी वाढल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: The kharif season is revived by nectar streams all over Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.