खडसेंना ईडीसमोर हजर होण्यासाठी १४ दिवसांची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:10+5:302020-12-31T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. ...

खडसेंना ईडीसमोर हजर होण्यासाठी १४ दिवसांची सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. त्यासाठी त्यांना ३० डिसेंबरला ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहायचे होते. मात्र २८ डिसेंबरपासूनच त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. त्यामुळे खडसे हे आता १४ दिवस विश्रांती घेतील. त्यानंतर ईडीसमोर जाणार आहेत.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांना काही दिवस आधी भोसरीच्या जमीन प्रकरणात ईडीने नोटीस बजावली. त्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना ३० डिसेंबरला उपस्थित राहायचे होते. मात्र त्यासाठी खडसे कुटुंबासह मुंबईला रवानादेखील झाले होेते. मात्र त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यांना सर्दी व कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती ही कोरोनासदृश लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना १४ दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्याबाबत ईडीला कळवण्यात आले असून त्यांंनी १४ दिवसांनंतर हजर होण्यास संमती दिली असल्याचे खडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच आपण ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.