खडसे, अत्तरदेंवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:58+5:302021-09-14T04:20:58+5:30
जळगाव : शहरात अनधिकृत होर्डिंग्स लावण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत ...

खडसे, अत्तरदेंवर गुन्हा दाखल करा
जळगाव : शहरात अनधिकृत होर्डिंग्स लावण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर असून, यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे व नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर आहेत. मुदत संपूनदेखील हे बॅनर अजूनही लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे व चंद्रशेखर अत्तरदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन व लोकार्पण करा
जळगाव : केंद्र शासनाच्या अमृत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगर या परिसरात ऑक्सिजन पार्क हा जवळ जवळ एक वर्षापासून पूर्णत्वास आलेला आहे. मात्र, अजूनही या पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील लोक ऑक्सिजन पार्कच्या वापरापासून वंचित आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पार्कचे लवकरात लवकर उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी केली असून, याबाबत मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
‘तो’ निधी आज होणार वर्ग
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा कामासाठी मनपाकडून महावितरणकडे दीड कोटी रुपयांचा निधी मंगळवारी वर्ग करण्यात येणार आहे. हा निधी वर्ग केल्यानंतरच विद्युत खांब हटविण्याचा कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निधीबाबत फिरवाफिरव सुरू होती. आता सर्व मंजुरीच्या फेऱ्यातून हा निधी अखेर महावितरणकडे वर्ग होणार आहे. आठवडाभरात हे खांब हटविण्याचा कामाला सुरुवात केली जाणार आहे.