करगाव बोगद्याची स्थिती ‘जैसे थे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:11+5:302021-06-04T04:14:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : शहरातील करगाव रस्त्याला लागणाऱ्या दोन बोगद्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहण्याची परिस्थिती ...

करगाव बोगद्याची स्थिती ‘जैसे थे'
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शहरातील करगाव रस्त्याला लागणाऱ्या दोन बोगद्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या समस्येकडे अनेक नागरिकांनी तक्रारी देऊनसुध्दा या समस्येवर तोडगा आतापर्यंत निघालेला नाही. शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या धुळे पुलाव्यतिरिक्त पर्यायी मार्ग नाही. यामुळे या बोगद्यांमध्ये पाणी साचले की, शहरवासीयांची मोठी अडचण निर्माण होते.
या परिसरात अनेक घरांचा विस्तार वाढला आहे. मंगल कार्यालय, कॉलेज, शाळा, क्लासेस यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची कायम जा-ये सुरू असते.
शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या धुळे पुलाव्यतिरिक्त पर्यायी मार्ग नाही. याची भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या समस्येसाठी लोकप्रतिनिधींनी पोकळ आश्वासने दिली आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अण्णा विसपुते यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. मात्र तरीसुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही. झोपलेल्या प्रशासनासाठी पुढे या परिसरातील नागरिक मोठे आंदोलन उभारणार आहे, असे परिसरातील नागरिकांनी घेतलेल्या बैठकीत निश्चित केले.
बजेटमध्ये तरतूद केली होती. मात्र कोरोना काळाची परिस्थिती असल्याने सरकारने निधी दिलेला नाही. माझी आमदारांना विनंती आहे, त्यांनी याचा पाठपुरावा करावा व राज्य शासनाने याची दखल घ्यावी.
-खासदार उन्मेष पाटील
सात वर्षापासून वेळोवेळी आम्ही आंदोलन केली. निवेदने दिली. त्यावेळी असलेले आमदार उन्मेश पाटील यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी आश्वासनदेखील दिले होते. मात्र अद्यापदेखील काम झालेले नाही.
-अण्णा विसपुते, तालुकाप्रमुख, मनसे, चाळीसगाव
पावसाळ्यात बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते. त्यामुळे रेल्वे रुळावरून ये-जा करावी लागते. यामध्ये कुणाचा जीवदेखील जाऊ शकतो. तर याला कोण जबाबदार असेल?
-वाल्मीक पाटील, रहिवासी, चाळीसगाव