सात महिन्यांनंतर नेहेते कुटुंबीयांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:55+5:302021-02-05T06:00:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळ येथील सुकदेव पाटील नगरातील रहिवासी मालती चुडामण नेहेते (८२) या महिलेच्या मृत्यूप्रकरणाच्या सात ...

सात महिन्यांनंतर नेहेते कुटुंबीयांना न्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ येथील सुकदेव पाटील नगरातील रहिवासी मालती चुडामण नेहेते (८२) या महिलेच्या मृत्यूप्रकरणाच्या सात महिन्यानंतर नेहेते कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. १० जून रोजी मालती नेहेते यांचा कोविड रुग्णालयातील कक्ष सातच्या स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. यात पाच डॉक्टरांसह सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर यंत्रणेने मोठा धडा घेत आता अशा घटना टाळण्यासाठी अनेक सुधारणा रुग्णालयात करण्यात आल्या आहेत.
मालती नेहेते या कोरोना बाधित होत्या. त्यांचे वय अधिक असल्याने प्रकृती खराब असल्याने त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मालती नेहेते यांचे चिरंजीव हे कोरोना बाधित होते व डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल होते. तर सूनेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नातू हर्षल नेहेेते हे पत्नी गर्भवती असल्याने पुणे येथून येऊ शकत नव्हते, अशा परिस्थिती मालती नेहेेते यांना कोविड रुग्णालयात २ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
असा होता घटनाक्रम
१ जून रोजी मालती नेहेते यांना भुसावळ येथून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल केले
२ जून रोजी त्या कक्ष ७ मधून बेपत्ता झाल्या होत्या.
५ जून रोजी याबाबत हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
१० जून रोजी कक्ष ७ च्या शौचालयात सकाळी मालती नेहेते यांचा मृतदेह आढळून आला होता.
११ जून रोजी डीनसह तीन डॉक्टरांचे निलंबन
१२ जून रोजी आणखी दोघांचे निलंबन
नोंदणी चुकीची अन् सर्वच चुकले
मालती नेहेते यांना भुसावळ येथून जळगाव पाठविताना त्यांचे केसपेपरवरील नाव चुकून मालती सुदाणे झाले होते. यानंतर नातवाला आजी हरविल्या, सापडल्या, पुन्हा हरविल्या अशा गोंधळाची माहिती मिळाली. अखेर आजी हरविल्याची नातवाने पोलिसात तक्रार दिली. नाव चुकले आणि यामुळे पुढे मोठा गंभीर प्रकार घडला.
दोषारोपपत्र पाठविले, मात्र नंतर काहीच नाही
मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुयोग चौधरी, डॉ. कल्पना धनकवार यांच्यासह अन्य दोघांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य विभाग अशा दोन स्वतंत्र यंत्रणांकडून दोन स्वतंत्र आदेश काढून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विविध पातळ्यांवर स्थानिक डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली विविध चौकशी समित्या स्थापन करून चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. यानंतर ऑगस्टच्या सुमारास एकत्रित दोषारोपत्र हे शासनाला पाठविण्यात आले होते. मात्र, याबाबत शासनाकडून पुढील कुठलाही निर्णय झालेला नाही. डॉ. खैरे हे औरंगाबाद येथेच असून अद्याप यातील निलंबित एकाही डॉक्टराला अन्य कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही.
आजी परत येणार नाही, मात्र, यंत्रणेने आता हे टाळावे
हर्षल नेहेते : न्यायालयाच्या निर्णयानंतर मांडल्या भावना
जळगाव : माझ्या आजीचा मृत्यू हा यंत्रणेचा अक्षम्य निष्काळजीपणा होता, हे सिद्ध झालेच आहे. मात्र, आता आजी परत येणार नसली तरी किमान आता अशा पद्धतीने कुणाचा जीव जाणार नाही, याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी, अशी अपेक्षा मालती नेहेते यांचे नातू हर्षल नेहेते यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना आहे तसाच आहे, मात्र, आज मृतांची संख्या घटली आहे, याचा अर्थ त्यांना व्यवस्थित उपचार मिळत आहे. मात्र, माझी आई आणि आजी यांच्याकडे डॉक्टर जातही नव्हते, दुर्लक्षामुळे आई व आजीला गमवावे लागले. त्यावेळी त्यांना योग्य पद्धतीने उपचार मिळाले असते किमान दोन वेळा त्यांच्या कक्षात पाहणी झाली असती तर आज आई व आजी दोन्हीही जीवंत असत्या, अशी खंतही हर्षल यांनी व्यक्त केली आहे. सर्व निकाल व निर्णय समजून घेऊ, याबाबत याचिका दाखल करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्याशी चर्चा करू, असेही हर्षल नेहेते यांनी सांगितले.