जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:08+5:302021-07-10T04:13:08+5:30

जळगाव : बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या जितेंद्र कंडारे याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ ...

Jitendra Kandare's police custody extended by three days | जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

जळगाव : बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या जितेंद्र कंडारे याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, तपासात प्रगती दिसून आल्याने ही वाढीव कोठडी देण्यात आली आहे.

पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर २०२० रोजी अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह दहा जणांविरुध्द फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल आहे. गेल्या सात महिन्यापासून या गुन्ह्यातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे हा फरार होता. मात्र, काही दिवसांपूर्वी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याच्या इंदोर येथून मुसक्या आवळण्यात यश आले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्ह्यासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे संकलित करण्याचे काम पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे़ नुकतेच जितेंद्र कंडारे याला सोबत घेऊन दोन पोलीस निरीक्षक व सहा कर्मचारी अशा आठ जणांचे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले होते़ त्यावेळी पथकाला बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावर लपविलेल्या २५ फाईल्स हस्तगत करण्यात आल्या होत्या़ दरम्यान, शुक्रवारी कंडारे यांच्या पोलीस कोठडीची मुदती संपली़ त्यामुळे त्यास पुणे न्यायालयातील न्या़ एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले़ पोलिसांच्या तपासात प्रगती दिसून आल्यामुळे सुनावणीअंती त्यास आणखी तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली़

सरकारपक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर कंडारे यास न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सरकारपक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला़ त्यात कंडारे यांनी ठेवीदारांची कशी पिळवणूक केली, कर्ज परतफेड केलेली नसताना, ‘नील’चे दाखले देण्यात आले, आदी मुद्दे सरकारपक्षातर्फे प्रभावीपणे मांडण्यात आले़ तसेच शपथपत्रसुध्दा खोटे असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले़ सरकार पक्षातर्फे ॲड. प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले़

Web Title: Jitendra Kandare's police custody extended by three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.