मामे-सासऱ्याच्या खुनाची मोहीम फत्ते करणारा झिंगल्या शोध पथकाला ‘झिंगवतोय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:47+5:302021-08-23T04:20:47+5:30

रावेर : तालुक्यातील पाडळे खुर्द शिवारातील सातपुड्याच्या पायथ्याशी गंगापुरी धरण परिसरात दारूच्या भट्टीवर काम करणाऱ्या झिंगल्या शहादा भिल (रा.बसाली, ...

'Jingavatoy' to Jingalya's search team | मामे-सासऱ्याच्या खुनाची मोहीम फत्ते करणारा झिंगल्या शोध पथकाला ‘झिंगवतोय’

मामे-सासऱ्याच्या खुनाची मोहीम फत्ते करणारा झिंगल्या शोध पथकाला ‘झिंगवतोय’

रावेर : तालुक्यातील पाडळे खुर्द शिवारातील सातपुड्याच्या पायथ्याशी गंगापुरी धरण परिसरात दारूच्या भट्टीवर काम करणाऱ्या झिंगल्या शहादा भिल (रा.बसाली, ता. बऱ्हाणपूर) हाच या खुनाच्या व पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यातील कळीचा सूत्रधार ठरला असून, त्याने या गुन्ह्यात दिलेला गुंगारा पोलीस पथकाला झिंगवणारा ठरला आहे. किंबहुना, खुनाच्या व पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले मयताची पूर्वाश्रमीची पत्नी, तिचा दुसरा दादला व झिंगल्याचे पाच साथीदार अशा सातही आरोपींना रविवारी रावेर न्यायालयात हजर केले असता न्या. ए. एच. बाजड यांनी सातही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बसाली येथील प्रताप खुमसिंग भिल (वय ४६) व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सागरीबाई हिला लग्नानंतर अपत्य झाले नाही. मात्र, दोन्ही संसारात रममाण असताना त्यांना वनक्षेत्रातील अतिक्रमण कायम करून नदीकाठच्या २० एकर क्षेत्र असलेल्या शेतजमिनीचा वनदावा मंजूर झाला होता. संततीसुख नसल्याने सागरीबाईने प्रतापला सोडचिठ्ठी देऊन लक्ष्मण वेरसिंग भिल (रा.रोहिणी) या बहिणीचाच मुलगा असलेल्या जमीनदाराशी दुसरे लग्न केले. मात्र त्यापासूनही तिला अपत्य नसल्याने संसारीक सुखात औदासीन्य आलेल्या सागरीबाईची नजर पहिल्या पतीच्या शेतजमिनीवर खिळू लागली. त्याचे आईवडील व एक मोठा भाऊ आधीच मयत असल्याने प्रतापचा काटा काढला म्हणजे त्याचा हयातीत असलेल्या दुसऱ्या भावाला दहशतीखाली घेऊन त्याची पत्नी म्हणून वारस दाखवून शेती बळकावण्याचा घाट त्यांनी घाटला.

मात्र, हा कट शिजवणारा कळीचा सूत्रधार ठरला तो लक्ष्मणचा भाचेजावई झिंगल्या शहादा भिल. झिंगल्या हा त्याचा भाऊ टाल्या, साथीदार सुरमल सत्तरसिंग भिल व त्याचा मुलगा जितेंद्र हे गंगापुरी धरणालगतच्या एका दारूभट्टीवर रोजंदारीने कामावर होते. प्रताप हा त्यांच्या लगतच्या अहिरवाडी शिवारातील एका शेतात शेतमजुरीला होता. त्यामुळे झिंगल्या व प्रताप हे संपर्कात असल्याची बाब लक्ष्मणने हेरल्याने त्याने त्याचा भाचेजावई असलेल्या झिंगल्याला ही मोहीम फत्ते करण्याची जणूकाही सुपारीच देऊन टाकल्याचे घटनेवरून दिसते.

झिंगल्या व झिंगल्याचा भाऊ व अन्य चार साथीदार यांनी प्रतापचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने झिंगल्या या गुन्ह्याचा खरा सूत्रधार दिसत असून त्याने दिलेला गुंगारा पोलिसांच्या शोध पथकाला गुंगवणारा ठरला आहे.

रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी फौजदार मनोहर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक त्याच्या मागावर असून, अटकेतील सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातही आरोपींची डीएनए चाचणी घेणार

पाडळे खुर्द शिवारातील सातपुड्याच्या पायथ्याशी झालेल्या या खुनाच्या व पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात आठ आरोपींनी सांघिकरित्या गुन्हा केला असल्याने पोलिसांना शंकेची सुई चुकचुकत असल्याने अटकेतील सातही आरोपींच्या डीएनए चाचणी शासकीय न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेतून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.

Web Title: 'Jingavatoy' to Jingalya's search team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.