एमजे कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST2021-03-05T04:16:36+5:302021-03-05T04:16:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील एम.जे.कॉलेज समोरील दुकानदारांनी पार्किंगच्या जागेवर केलेले बांधकाम मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गुरुवारी तोडण्यात ...

JCB on encroachment on MJ College campus | एमजे कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर जेसीबी

एमजे कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर जेसीबी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील एम.जे.कॉलेज समोरील दुकानदारांनी पार्किंगच्या जागेवर केलेले बांधकाम मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गुरुवारी तोडण्यात आले. भोइेटे शाळालगत असलेली १२ दुकानांचे पक्के बांधकाम व पत्र्याचे शेड तोडण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान काही दुकानदारांनी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत देखील घातली. याबाबत तीन जणांवर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम.जे.कॉलेज समोरील अनेक दुकानदारांनी पार्किंगच्या ठिकाणी बांधकाम करून ठेवले होते. यामुळे या दूकानांवर आलेले ग्राहक थेट रस्त्यालगत वाहने पार्क करत होते. यामुळे या रस्त्यालगत नेहमी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत होती. याबाबत मनपा प्रशानाकडून या भागातील नागरिकांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक गुरुवारी दुपारी २ वाजता या भागात पोहचले व थेट कारवाईला सुरुवात केली.

दुकानदारांनी घातली हुज्जत, उपायुक्तांनी दाखल केला गुन्हा

मनपाच्या पथकाकडून कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काही दुकानदारांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. मनपा उपायुक्तांनी हुज्जत घालणाऱ्यांना समज दिली. मात्र, दुकानदारांकडून कारवाईला विरोध होत राहिला. मात्र, उपायुक्तांनी दुकानदारांचा विरोध झुगारून कारवाई सुरुच ठेवली. मनपा उपायुक्तांनी थेट जेसीबीच्या सहाय्याने दुकानांचे शेड तोडण्याचे आदेश दिले. तसेच हुज्जत घालणाऱ्यांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विशाल मेधानी (वय ३४), नारायण मेधानी , गौरव लवंगडे यांचा समावेश आहे.

गाळेधारकांनी गाळे दिले भाड्यावर

मनपाने ज्या गाळेधारकांसोबत करार केला आहे. त्या गाळेधारकांनी याठिकाणी पोटभाडेकरू ठेवले आहेत. याबाबत मनपा उपायुक्तांनी कारवाई दरम्यान ही बाब समजल्यानंतर संबधित गाळेधारकांना नोटीसा बजाविल्या आहेत. दरम्यान, या भागातील १२ दुकानांचे पक्के शेड व बांधकाम मनपाकडून तोडण्यात आले आहे.

Web Title: JCB on encroachment on MJ College campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.