जामनेर : यंदा तालुक्यात दमदार पावसाअभावी वाघूर, कांग व सूर नद्यांना एकही पूर न आल्याने भविष्यात पाणी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारअखेर सरासरीच्या ५० टक्के इतका पाऊस झाला असून, पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र धरण, तलाव भरले नाही.
कांग, वाघूर व सूर या नद्या तालुक्यातील जलवाहिन्या असून, यंदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस न झाल्याने एकाही नदीला पूर आला नाही. तीनही नद्यांचे पाणी वाघूरला मिळत असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होते.
वाघूर धरणातून जळगाव, जामनेरला पिण्यासाठी व शेतीसाठीदेखील पाणी पुरविले जाते.
पूर न आल्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ झालेली नाही. पुढील नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास नदी-नाले वाहून निघतील अशी अपेक्षा आहे.
----------------------------------------------------------------------
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा
वाघूर धरण गेल्या वर्षी जुलैमध्येच १०० टक्के भरले होते. धरणातील पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी वापर केला जातो. सध्या धरणात ६२ टक्के पाणी साठा असून फक्त पिण्यासाठी राखीव ठेवल्यास दोन वर्ष पुरेल असे वाघूर धरण अभियंत्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------------
तालुक्यातील नेरी, हिंगणे, पळासखेडे बुद्रुक, केकतनिंभोरे, हिवरखेडे बुद्रुक, चिंचखेडे बुद्रुक, खादगाव, गारखेडे या भागातील शेती वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर अवलंबून आहे. गोद्रीजवळील कांग प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा आहे. प्ररकल्पातून फत्तेपूर व परिसरातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरविले जाते.
पावसाळ्याचे तीन महिने संपण्याच्या मार्गावर असून सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्यास भीषण संकट ओढावू शकते.
फोटो कॅप्शन
पावसाअभावी कोरडे पडलेले जामनेरच्या कांग नदीचे पात्र.