जामनेरला रोजंदारीवरील सफाई कामगार धडकले पालिकेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:47+5:302021-09-15T04:20:47+5:30
जामनेर : सफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे १२० कामगारांनी योग्य रोजंदारी मिळत नसल्याने काम बंद केले आहे. ...

जामनेरला रोजंदारीवरील सफाई कामगार धडकले पालिकेवर
जामनेर : सफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सुमारे १२० कामगारांनी योग्य रोजंदारी मिळत नसल्याने काम बंद केले आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने या संतप्त कामगारांनी पालिकेवर धडक देत मंगळवारी घोषणाबाजी केली.
शहरातील सफाईचा ठेका देण्यात आला असून, काही दिवसांपासून कमी मिळणाऱ्या रोजगाराच्या विषयावरून या कामगारांचे काम बंद झाले आहे. यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरल्यावर नगरपालिका व नगरसेवकांनी पालिका व खासगी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता आपल्याला बाजूलाच ठेवले जात आहे, अशी भावना निर्माण झाल्याने या संतप्त कामगारांनी मंगळवारी सकाळी पालिका कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत समस्या सोडविण्याची मागणी केली. नगरसेवक व राजकीय कार्यकर्त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले असून, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.
सात दिवसांपासून केले काम बंद
रोजंदारी वाढवून मिळावी, प्रॉव्हिडंट फंड जमा करावा या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडील कामगारांनी कचरा संकलनाचे काम बंद केल्याने ठिकठिकाणी कचरा साचला आहे. परिणामी दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठेकेदाराबाबत यापूर्वीही तक्रारी आल्याने पालिकेने त्यांना तीन वेळेस नोटीस बजावली आहे.
नगरसेवक व नगरपालिकेने कचरा उचलण्याचे काम सुरू केल्याने काही कामगारांनी याबाबत नगरसेवकांना जाब विचारला. पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांचे कक्षात कामगार व त्यांचे प्रतिनिधींनी यावेळी चर्चा केली. ठेकेदारास तिसरी नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून खुलासा आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे भोसले यांनी कामगारांना सांगितले.
---
गेल्या काही वर्षांपासून आम्ही पालिकेच्या घंटागाडीवर कचरा संकलनाचे काम करीत आहोत. २०० रुपये रोजंदारीवर घर चालविणे शक्य नाही. त्यामुळे ठेकेदाराने रोजंदारी वाढवून द्यावी व प्रॉव्हिडंट फंड मिळावा ही मागणी आहे.
- गणेश उपम, सफाई कामगार, जामनेर
फोटो : १५ एचएसके ०१
जामनेर नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करताना रोजंदारीवरील सफाई कामगार.