जामनेरात कोरोना आटोक्यात, आता डेंग्यूची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 21:25 IST2020-10-27T21:24:15+5:302020-10-27T21:25:02+5:30
जामनेरला कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता डेंग्यूची साथ पसरत आहे.

जामनेरात कोरोना आटोक्यात, आता डेंग्यूची साथ
जामनेर, जि.जळगाव : कोरोना नागरिकांची पाठ सोडत नाही तोपर्यंत शहर व ग्रामीण भागात डेंग्यूचा शिरकाव होत आहे. तालुक्यात सुमारे ५० रुग्णांना डेंग्यू सदृश्य लागण झाल्याचे तालुका आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या आठवड्यात डेंग्यू सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यूवर उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामीण भागात २३ जणांवर डेंग्यूचे उपचार केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाली आहे.
गेले सात महिने कोरोनाशी झुंज देत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळत असतानाच डेंग्यू घरात शिरत असल्याने धडकी भरली आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लागवण मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे.
दूषित पाणी व डासांची वाढ
शहर व गाव खेड्यात सध्या डासांची उत्पत्ती वाढली असुन नगरपालिका व ग्रामपंचायतींनी फवारणी करणे गरजेचे आहे. तीन व चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक पिण्याचे पाणी साठवून ठेवतात. साठविलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने आठवड्यातुन १ दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.