जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर नगरपालिकेत विरोधकांचे नेतृत्व कुणाकडे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:18 IST2017-11-20T16:01:54+5:302017-11-20T16:18:02+5:30
जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर नगरपालिकेत विरोधकांचे नेतृत्व कुणाकडे ?
आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.२० : नगरपालिकेत सक्षम विरोधकच सत्ताधारी भाजपा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिल्लक ठेवला नसल्याची स्थिती असतांना आगामी नगरपालिका निवडणूक विरोधक कुणाच्या नेतृत्वाखाली लढतील याबाबत सध्या शहरात चर्चा सुरु आहे.
जामनेर शहरात विविध अमिष दाखवून विरोधकांना जवळ करण्याची खेळी भाजपने दोन वषापूर्वीच खेळत पालिकेतील सत्ता हस्तगत केली आहे. ज्या विरोधकांच्या मदतीने सत्ता मिळविली त्यातील काहींना पालिकेबाहेर ठेवण्यात ते यशस्वी ठरले. यात अपात्र करण्यापर्यंत मजल गेली. विरोध करणाºयांची तोंड बंद करण्याचे कसबही भाजपाला अवगत असल्याने कुणी बोलतच नव्हते.
२०१३ ची निवडणुक माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित लढत विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपला मोठा धक्का बसला होता. पारस ललवाणी यांना नगराध्यक्षपद दिले गेले. सुरुवातीला आघाडीत आनंदी आनंद दिसत असला तरी ललवाणी यांना काम करीत असतांना त्यांचेच सहकारी सहकार्य देत नव्हते. यात जैन समर्थकच असल्याचा आरोपही केला गेला.
एप्रिल २०१८ मध्ये होणारी निवडणुक काँग्रेस आघाडी कुणाच्या नेतृत्वाखाली लढेल हा प्रश्न आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेशी असलेली जवळीक पाहता त्यांचे समर्थक भाजप विरोधात लढतील या विषयी साशंकताच आहे. विरोधकांना एकत्र करुन निवडणुकीत उतरण्याचे कौशल्य पारस ललवाणी यांना दाखवावे लागेल. त्यांच्या भूमिकेकडे भाजप विरोधकांचे लक्ष लागले आहे. ललवाणी हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांना राष्ट्रवादीचे संजय गरुड यांची साथ मिळत असल्याने निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मदत मिळेलच.