जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्रातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
फिट इंडिया फ्रीडम रनची सुरुवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी दिनेश पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते.
पोलीस कवायत मैदान, शिवतीर्थ मैदान, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर या दौडचा शेवट करण्यात आला. दौडच्या उद्घाटनप्रसंगी विनोद ढगे यांच्या पथकाने पोवाडा सादर केला. नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, आकाश धनगर, चेतन वाणी, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे आदींसह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये बेंडाळे महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, मू.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.