जळगाव - लखनऊवरून मुंंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील एका बोगीत आग लागल्याच्या भीतीने त्यातील प्रवासी रेल्वे रुळांवर थांबले असतानाच वेगात आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून बाराजण ठार झाले. ही धक्कादायक घटना बुधवारी परधाडे (ता. पाचोरा) रेल्वेस्थानकाजवळ घडली. या दुर्घटनेत ४०हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव स्थानकावरून दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस पाचोऱ्याच्या दिशेने निघाली. इंजिनच्या मागील डब्यातील प्रवाशांना धूर निघत असल्याचे जाणवले. या दरम्यान डी-३ या बोगीतील प्रवाशांनी आपत्कालीन चेन ओढली. त्यानंतर गाडी परधाडे स्टेशननजीक असलेल्या पुलानजीक थांबली. यादरम्यान जनरल बोगीत आलेल्या चहा विक्रेत्याने आग लागल्याचे सांगितले. त्यामुळे भीतीने काही प्रवाशांनी खाली रुळांवर उड्या मारल्या. तशातच समोरून ११० किलोमीटर वेगाने कर्नाटक एक्स्प्रेस आली आणि प्रवाशांना चिरडत गेली.
बाराजणांचे मृतदेह हातीसायंकाळी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२ प्रवाशांचे मृतदेह आणले होते, तर ५ जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
५ लाखांचे अर्थसाहाय्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाईल, असे जाहीर केले.
सहा जणांची ओळख पटलीमृतांमध्ये ८ पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यात लच्छीराम पासी (५०, रा. बाके, नेपाळ), कमला भंडारी (४८, रा. मुंबई), बाबू खान (२८, उत्तर प्रदेश), नसरुद्दिन सिद्दिकी (२०, उत्तर प्रदेश), इम्ताज अली (३५, उत्तर प्रदेश), हिनू नंदराम विश्वकर्मा (१०, रा. नेपाळ) या सहा जणांची ओळख पटली आहे.
आठ गाड्या खोळंबल्यारेल्वे अपघातामुळे मुंबईकडून येणाऱ्या व जाणाऱ्या सुमारे ८ गाड्या दोन तास खोळंबल्या होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जखमींना मदत उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.