जळगाव : राष्ट्रपुरूषांच्या विटंबनेमुळे भालोद पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 15:00 IST2017-01-14T11:41:30+5:302017-01-14T15:00:51+5:30
अज्ञात माथेफिरूने राष्ट्रपुरूषांच्या फलकाची विटंबना केल्यामुळे जळगावातील यावल तालुक्यातील भालोद गाव पेटले असून टायर्सची जाळपोळ करण्यात आली.

जळगाव : राष्ट्रपुरूषांच्या विटंबनेमुळे भालोद पेटले
>ऑनलाइन लोकमत
भालोद ( जळगाव), दि. १४ - अज्ञात माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाची विटंबना केल्यामुळे जळगावातील यावल तालुक्यातील भालोद गाव पेटले आहे. संतप्त जमावाने शनिवारी सकाळी बामणोद-सांगवी रस्त्यावर रास्ता रोको करीत टायर्सची जाळपोळ केली तसेच काही दुकानांवर दगडफेकही करण्यात आली असून गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अज्ञात व्यक्तीने डॉ. आंबेडकरांच्या बॅनरची विटबंना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर त्याचे गावात तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने गावातील सुरू असलेल्या हॉटेल्ससह दूध डेअरीवर दगडफेक केल्याने तणाव आणखी वाढला तसेच पळापळही झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला़. जिल्हाभरातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना संयम राखण्याचे आवाहन केले.