जळगावात घरात घुसून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:47+5:302021-09-24T04:19:47+5:30
जळगाव : भावाचा खून केल्याचा बदला म्हणून आकाश मुरलीधर सपकाळे याचा खून करण्यासाठी घरात घुसून गोळीबार केल्याची थरारक घटना ...

जळगावात घरात घुसून गोळीबार
जळगाव : भावाचा खून केल्याचा बदला म्हणून आकाश मुरलीधर सपकाळे याचा खून करण्यासाठी घरात घुसून गोळीबार केल्याची थरारक घटना गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता कांचन नगरात घडली. याप्रकरणी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा पूत्र बाबु सपकाळे, सोनू सपकाळे, मिलिंद सकट, प्रद्युग्न उर्फ बंटी नंदू महाले, मयुर उर्फ विक्की दीपक अलोने (रा.शिवाजी नगर) व राहूल भालेराव (रा.पिंप्राळा हुडको) यांच्यासह आकाश मुरलीधर सपकाळे, नितीन मुरलीधर सपकाळे, मुरलीधर गयभू सपकाळे व रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) यांच्याविरुध्द परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले असून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२० रोजी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याचा खून झाला होता. हा खून लाडू गँगचा प्रमुख आकाश सपकाळे, गणेश सोनवणे, रुपेश सपकाळे, तुषार सोनवणे व महेश निंबाळकर यांनी केल्याचा आरोप आहे. भावाच्या खुनाचा बदला घ्यायचा असल्याने बाबू व सोनू सपकाळे या दोन्ही भावांनी आकाश सपकाळे याला ठार मारण्यासाठी विक्की अलोने याला सुपारी दिली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता विक्की अलोने, मिलिंद सकट, बंटी महाले यांनी आकाशच्या घरात घुसून गोळीबार केला. त्यात झालेल्या झटापटीत बंटी व मिलिंद यांनी रिक्षाने पळ काढला तर त्यांच्या मागे पळत असताना गटारीत पाय अडकल्याने विक्की जागेवरच पडला. त्यावेळी आकाश व त्याच्या कुटुंबियांनी त्याला मारहाण केली. त्यात तो बेशुध्द पडला. आकाश याने सपकाळे गटाविरुध्द तर विक्की याने आकाशच्या कुटुंबियांविरुध्द तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.