जळगावात पतंगाच्या मांजाने चिरला डॉक्टरचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:45+5:302021-09-05T04:20:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महामार्गावरून दुचाकीने तांबापुरात जात असताना पतंगाच्या चायना मांजाने डॉ. जवाद अहमद (वय २७, मूळ ...

In Jalgaon, a doctor's throat was cut by a moth | जळगावात पतंगाच्या मांजाने चिरला डॉक्टरचा गळा

जळगावात पतंगाच्या मांजाने चिरला डॉक्टरचा गळा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महामार्गावरून दुचाकीने तांबापुरात जात असताना पतंगाच्या चायना मांजाने डॉ. जवाद अहमद (वय २७, मूळ रा.अमरावती) यांचा गळा चिरल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. जवाद यांना एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ११ टाके घालण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून शहरात ते सालार नगरात वास्तव्याला आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून सध्या प्रशिक्षण सुरू आहे. तांबापुरात त्यांनी स्वत:चे क्लिनिक सुरू केलेले आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते दुचाकीने (क्र.एम.एच.१९.एयु.६८१४) तांबापुरा येथे जात असताना महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ खांबाला अडकलेला चायना मांजा हवेतून उडत त्यांच्या गळ्याजवळ आला. या मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेल्याने डॉ. जवाद दुचाकीसह खाली कोसळले. या घटनेच्यावेळी अनेक वाहनचालक समोरून गेले, मात्र मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. शेवटी एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने मेहरुणमधील रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येऊन गळ्यात आतून एक तर बाहेरून ११ टाके घालण्यात आले.

गळा दाबून धरल्याने रोखला रक्तस्राव

डॉ. जवाद अहमद यांचा गळा कापल्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाला होता. जवाद स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव रोखण्यात त्यांना यश आले. रिक्षाचालक कलीम शेख यांनी मेहरुणमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथील वैद्यकीय प्रमुख डॉ. मिनाज पटेल, हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्राव रोखला. डॉ. जवाद यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता, तसेच हृदयाचे ठोकेदेखील कमी झाले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ. मीनाज पटेल यांनी सांगितले.

Web Title: In Jalgaon, a doctor's throat was cut by a moth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.