शहर वाहतूक शाखेतर्फे नेहमीच वाहन तपासणी मोहीम राबविली जाते. रविवारी मात्र ही तपासणी जरा हटकेच होती. आकाशवाणी चौकात पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, उपनिरीक्षक कैलास पाटील व सहकाऱ्यांनी थांबून एकेक वाहन अडवून वाहनधारकांची चौकशी केली. त्यांच्या भलेही आता काही उल्लंघन केलेले नसेल तरी पूर्वीचा काही दंड आहे का? याची पडताळणी करण्यात आली. ज्यांनी नियमांचे पालन केले, त्याना विनाविलंब सोडण्यात येत होते. यात खऱ्याअर्थाने गोची झाली ती रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काम करणारे तरुण, महागड्या दुचाकीवर स्टंटबाजी करणारी श्रीमंतांची मुले यांची. चित्रविचित्र हेअरस्टाईल असलेल्या तरुणांची कसून चौकशी केली जात होती. यात बहुतांश जणांकडे वाहन परवाना नव्हता तर काही जण ट्रीपल सीट तर काही जण स्टंटबाजी करीत होते. या सर्वांवर कारवाईचा दंडूका फिरविण्यात आला. ज्या तरुणाने दुचाकीचा क्रमांक मानेवर गोंदलेला होता. त्याची कानडे यांनी कसून चौकशी केली. जागेवरच थांबवून त्याची माहिती काढली असता वर्षभरापूर्वीच तो हद्दपार झालेला होता. त्याची मुदत नुकतीच पूर्ण झालेली होती. मात्र दुचाकीवर मागील दोन हजाराचा दंड होता, त्यामुळे ही दुचाकी ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, रविवारी दिवसभरात ७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून ३७ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोट...
नाकाबंदी व तपासणी नियमित असते, मात्र आज संशयास्पद व्यक्तींची बारकाईने तपासणी केली. त्यात अनेक गुन्हेगार कारवाईच्या कचाट्यात सापडले. प्रामाणिकपणे संशयास्पद व्यक्ती व वाहनांची कसून तपासणी केली तर नक्कीच चुकीच्या प्रकारांना आळा घातला जाऊ शकतो. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासह बेशिस्त पार्कींग पुढील टार्गेट असणार आहे.
-लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा