महिला व मुलींना एकटे पाठवायला भीतीच वाटते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:17+5:302021-09-16T04:21:17+5:30
शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे; घराबाहेर पडलेल्या मुली सुरक्षित किती? रियालिटी चेक सुनील पाटील जळगाव : शहरात गुन्हेगारी व टवाळखोरी ...

महिला व मुलींना एकटे पाठवायला भीतीच वाटते
शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे; घराबाहेर पडलेल्या मुली सुरक्षित किती?
रियालिटी चेक
सुनील पाटील
जळगाव : शहरात गुन्हेगारी व टवाळखोरी कमालीची वाढत चालली आहे. बाजारात असो किंवा क्लासला, अथवा फिरायला जाणाऱ्या महिला व मुलींना शहरात भीती वाटू लागली आहे. पिंप्राळा बाजार, वाघ नगरातील मोकळे पटांगण, मेहरुण तलाव, फुले मार्केट परिसर, काव्यरत्नावली चौक, रामानंद नगरातील शंभर फुटी रस्ता आदी भाग रोडरोमिओंचे कट्टे बनले आहेत.
‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील काही भागात फिरून पाहणी केली असता वाघनगरात अल्पवयीन व मूकबधिर अशा दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे, त्यानंतरही या भागात विकृती कमी झाली नसल्याचे पालकांनी सांगितले. एका प्रकरणात तर अल्पवयीन मुलगीच गर्भवती राहिली आहे. यात अजूनही आरोपी निष्पन्न झालेला नाही. जेव्हा टवाळखोर दुचाकीने स्टंटबाजी करतात, मुली-महिलांची छेड काढतात, तेव्हा आपण सुरक्षित आहोत का? असा प्रश्न या मुलींना पडतो. त्यापेक्षा जास्त भीती पालकांना वाटते. पूर्वी शहरात घडलेल्या घटना आठवल्या तर अंगाला काटे येतात, असे एका पालकाने सांगितले. रामानंद नगरच्या घाटानजीक तसेच कोल्हे हिल्स या भागात देखील तरुणीवर अत्याचाराचे प्रसंग घडलेले आहेत. मुंबईत पुन्हा निर्भयाची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे मुली व महिलांना एकटे कुठे पाठवायला भीती वाटते असे देखील या भागात नागरिकांनी सांगितले. संध्याकाळी अंधार पडल्यावर मोकळ्या जागेत अनेक टवाळखोर मद्यप्राशन करतात, बाजाराच्या दिवशी हा त्रास जास्त असतो, असेही एका महिलेने सांगितले.
या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का?
मेहरुण तलाव -
शहरात सर्वाधिक रोडरोमिओंचा त्रास मेहरुण तलाव परिसरात होतो. या भागात निर्भया व दामिनी पथकाची गस्त असते, मात्र ती म्हणावी तितकी नसते. बुधवारी त्याचा प्रत्यय आला. तलाव परिसरात पहाटे पाच वाजेपासून तर रात्री ११ वाजेपर्यंत मुली, महिला या कुटुंबासह तर कधी मित्र, मैत्रीणींसोबत येत असतात. हीच संधी साधून टवाळखोर या भागात जास्त फिरतात, बुधवारी दुपारी असे चित्र नजरेस पडले.
रेल्वे स्थानक -
रेल्वे स्थानक, बीग बजार परिसरात परिसरातदेखील रोडरोमिओंचा वावर असतो, या भागात मुलींची छेड काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. शहर पोलीस ठाण्यात असे अनेक किस्से आले होते, मात्र भीतीपोटी मुली तक्रार देत नसल्याने गुन्हे दाखल झालेले नाहीत. मुलींना बघून दुचाकीवर स्टंटबाजी करणारे टवाळखोर सकाळी ११ वाजता नजरेस पडले.
मू.जे. महाविद्यालय परिसर -
मू.जे.महाविद्यालय परिसरात तरुण-तरुणींचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला. या भागात चित्रविचित्र हेअरस्टाईल, गॉगल्स लावलेले टवाळखोर दुचाकीवर घिरट्या मारत होते तर चहा, नाश्त्याच्या ठिकाणी मुद्दाम जाऊन मुलींकडे सारखेसारखे बघत होते. त्यानंतर बहिणाबाई उद्यानाला लागून देखील अशीच परिस्थिती होती. मात्र या भागात पोलिसांचे वाहन पाहून टवाळखोर तेथून पुढे सरकले.