पॅंसेजर सुरू करण्याबाबत संसदेत आवाज उठवावा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:40+5:302021-07-15T04:13:40+5:30
जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी ...

पॅंसेजर सुरू करण्याबाबत संसदेत आवाज उठवावा..
जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवासी संघटनांनी व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत अनेकदा मागणी करूनही, अद्याप एकही पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील गेल्या आठवड्यात पॅसेंजर सुरू करण्याबाबत डीआरएम यांच्यांशी फोन वरून चर्चा केली.मात्र, एवढे सगळे रामायण होऊनही, रेल्वे प्रशासन ऐकत नसल्यामुळे खासदार उन्मेष पाटील यांनी आता १९ जुलैपासून होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पॅसेंजर सुरू करण्याबाबत आवाज उठविणे गरजेचे आहे, अशी चर्चा बुधवारी चाळीसगावहून जळगावकडे येणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये चांगलीच रंगली होती. पाचोऱ्याला काशी एक्सप्रेस थांबल्यानंतर, पाचोऱ्याहूनही दोन प्रवासी या एक्सप्रेसमध्ये बसले. त्यांनीदेखील चाळीसगावच्या प्रवाशांची पॅसेंजर सुरू होण्याबाबत चर्चा ऐकून, या चर्चेत सहभाग घेतला. पाचोऱ्याहून बसलेल्या दीपक पवार नावाच्या प्रवाशाने चाळीसगावच्या प्रवाशांशी बोलतांना सांगितले की, केंद्रात भाजपाचे सरकार असून, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. मात्र, दीड वर्षात एकाही खासदाराने पॅसेंजर सुरू करण्याबाबत पुढाकार घेतलेला दिसून आला नाही. तसेच गीतांजली एक्सप्रेसला पाचोरा व चाळीसगावला थांबा देण्याबाबत अनेक वर्षापासून मागणी सुरू असून, ती मागणीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे खासदारांनी आता याच्या-त्याच्याशी बोलण्यापेक्षा खरोखर त्यांना मतदार संघातील नागरिकांची काळजी असेल, पॅसेंजर सुरू करण्याबाबत थेट संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी करून, चाळीसगावच्या प्रवाशांना खासदारांकडे पॅसेंजर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचा सल्लाही दिला.