लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबुड; केंद्रांवरील गोंधळ वाद सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:12+5:302021-09-15T04:21:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर नेहमीच वाद उद्भवत असतात. त्यात काही केंद्रावर काही राजकीय पुढारी ...

लसीकरणात पुढाऱ्यांची लुडबुड; केंद्रांवरील गोंधळ वाद सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर नेहमीच वाद उद्भवत असतात. त्यात काही केंद्रावर काही राजकीय पुढारी किंवा स्वयंघोषित पुढारी येऊन अधिकच वाद घालत असतात. असे अनेक प्रकार तालुक्यातील काही केंद्रांवर घडले आहे. तर लस न मिळाल्याने शहरातील काही केंद्रांवरचा गोंधळही थांबत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम ही १६ जानेवारीपासून राबविली जात आहे. अगदी सुरुवातीला या लसीची अनेकांच्या मनात भीती असल्याने मोहीम काहीशी संथ गतीने सुरू होती. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मात्र, नंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली व त्यानंतर मात्र, यात राजकीय पुढाऱ्यांची किंवा स्वयंघोषित अनेक पुढाऱ्यांची केंद्रांवर लुडबुड सुरू झाल्याचे प्रकार समोर येऊ लागले. शहरातील काही केंद्रांवर असे वाद सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर समोर येत होते. यामुळे मात्र, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असतो.
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस : १३२५२८८
दोन्ही डोस : १७६३७४२
डोस उपलब्ध होणार
मंगळवारी रात्री लसींचे डोस आल्यानंतर बुधवारी जिल्हाभरातील केंद्रांना त्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शहराला गेल्या वेळी २५ हजार डोस देण्यात आले होत. त्यात सलग चार ते पाच दिवस लसीकरण सुरू होते. आता पुन्हा डोस येणार असून त्यातही शहराला डोस मिळणार आहे.
असे घडतात प्रकार
१ शिरसोली येथील केंद्रावर पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे असे वाद उद्भवत असतात. केंद्रांवर रांगेत उभा असणाऱ्या लोकांना डावलून अनेक वेळा पुढारी वशिलेबाजी करीत आत जात असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
२ केंद्रावर वाद टाळण्यासाठी केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असतो. यात शहरातील शिवाजीनगरातील डी. बी. जैन रुग्णालयात मध्यंतरी मोठे वाद समोर आले होते.
३ अनेक वेळा लस उपलब्धतेच्या मुद्द्यावरून वादंग होत असतात. चेतनदास मेहता रुग्णालयात हा गोंधळ व गर्दी नियमित असते.
कोट
केंद्रांवर लसीकरणासाठी ५० टक्के ऑनलाइन व ५० टक्के ऑफलाइन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन नोंदणी शक्य नाही ते थेट केंद्रांवर जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकतात. आता बऱ्यापैकी केंद्रांवरील गर्दी कमी झालेली आहे. लसीकरणाचे कामकाज उत्तमरीत्या सुरू आहे.
-डॉ. समाधान वाघ, लसीकरण अधिकारी