ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:01 IST2020-11-05T14:59:59+5:302020-11-05T15:01:46+5:30
ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे. अनेक गावांच्या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहनांचे अपघातदेखील होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी असताना या विभागाचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचे गाव असलेल्या दोधवद हिंगोना रस्त्यावरदेखील अशीच परिस्थिती आहे. याशिवाय कलाली, निम, तांदळी, कळमसरे परिसर, मुडी मांडळ परिसर, मंगरूळ परिसर, फाफोरे परिसर, पातोंडा व टाकरखेडा परिसर आदी गावांकडील रस्त्यांवर हेच चित्र असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आताच एस टी बस सुरू झाल्या आहेत. प्रवास करताना एसटीच्या खिडक्या उघड्या राहत असल्याने वाटेत अचानक काटेरी बाभूळ आले असता, ते खिडकीतून आत घुसून अनेक प्रवाशांना डोळ्यांना अथवा चेहऱ्याला इजा होत असते. विशेष करून बालके खिडकीतच बसत असल्याने ते यात जखमी होत असतात. यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहे.
याशिवाय अनेक गावांच्या रस्त्यावर वळणे असून याठिकाणीच ही काटेरी झुडपे वाढली असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे दुचाकी व इतर वाहने एकमेकांना धडकून अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी मारवड बोहरा रस्त्यावरदेखील झाडे झुडपांमुळे दुचाकीस्वारांचे दोन अपघात झाले होते. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याने ते अनेक दिवस खाजगी रुग्णालयात दाखल होते. यामुळे ग्रामस्थांची ओरड होऊनदेखील संबंधित विभागाने झाडे झुडपे काढली नाहीत. अखेर बोहरा ग्रा.पं.चे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी स्वखर्चाने ही झाडे झुडपे काढली होती.
बांधकाम विभागास दिल्या स्पष्ट सूचना-आ.अनिल पाटील
अमळनेर तालुका व परिसरात अनेक गावांच्या रस्त्यालगत काटेरी झाडे झुडपे वाढल्याचे मी स्वतः पाहिले असून यासंदर्भात अनेक गावातून तक्रारीदेखील माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत,यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागास झाडे झुडपे काढण्याबाबत आधीच पत्र दिले आहे. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तशा सूचनादेखील केल्या आहेत.
-आमदार अनिल पाटील, अमळनेर