शिक्षक पतपेढीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:35+5:302021-09-24T04:20:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढीमध्ये सन २०१८ पासून झालेल्या कर्मचारी ...

शिक्षक पतपेढीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढीमध्ये सन २०१८ पासून झालेल्या कर्मचारी भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून एवढेच नव्हे तर अध्यक्षांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या सख्ख्या वहिनीला पतपेढीमध्ये नोकरी दिली. हा सरळ पदाचा गैरवापर असल्याचा खळबळजनक आरोप करित संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी, अशी मागणी माध्यमिक शिक्षक पतपेढी बचाव समितीचीचे समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केली.
दरम्यान, कोरोना काळात जेव्हा संपूर्ण देशभर भरती प्रक्रिया बंद होती, अशा काळात जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढीमध्ये कर्मचारी भरती कशी काय करण्यात आली, असा सवाल उपस्थित करित त्यांनी यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची सुध्दा सुद्धा चौकशीची मागणी शिरसाठ यांनी केली असून या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. २६ सप्टेंबर रोजी पतपेढीची सर्वसाधारण सभा आहे ही सभा अवैध असून ती बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी भरत शिरसाठ यांनी केली.
मोरे यांना तात्काळ कामावर रूजू करावे अन्यथा आंदोलन
अध्यक्षांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे पतपेढीतील लिपिक रवींद्र मोरे यांच्याविरूध्द चौकशी समिती बसवून त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्रिस्तरीय चौकशी समिती मधील दोन सदस्यांनी मोरे यांना शिक्षा माफ व्हावी व कमीत कमी शिक्षा व्हावी या पद्धतीचा अहवाल दिलेला आहे. त्यामुळे मोरे यांना तात्काळ कामावर रूजू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, बामसेफचे जिल्हा प्रभारी सुमित्र अहिरे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, कास्ट्राईबचे अनिल सुरडकर आदी उपस्थित होते.
००००००
रवींद्र मोरे यांच्यावर नियमानुसार कारवाई केली आहे. ते २००८ पासून नियमबाह्य पदोन्नतीसाठी मागणी करित होते. यासाठी ते वारंवार कार्यकारी मंडळाला तसेच वरिष्ठ कार्यालयाला अर्ज करित होते. त्यांना अनेकवेळा सांगूनही त्यांनी ती कृती सुरू ठेवली असल्यामुळे व इतर काही कारणामुळे त्यांच्यावरती नियमानुसार चौकशी समिती नियुक्त करून कारवाई केलेली आहे. त्यांनी दोन वेळेस संस्थेत माफीनामा लिहून दिलेला आहे. परंतु, ते नेहमीप्रमाणे घुमजाव करतात.
- शालिग्राम भिरूड, अध्यक्ष, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढी