गणेश विर्सजन मार्गाची महापाैरांसह पाेलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:55+5:302021-09-04T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येत्या आठवडाभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, यासाठी आता मनपा प्रशासन व जिल्हा पोलीस ...

गणेश विर्सजन मार्गाची महापाैरांसह पाेलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येत्या आठवडाभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, यासाठी आता मनपा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनदेखील कामाला लागले आहे. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मार्ग व मेहरूण तलाव परिसराची पाहणी करून मनपाकडून होत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला आहे.
पुढील आठवड्यात गणेशाेत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या प्रमाणे गणेश मंडळांना तयारी करावी लागते त्याच पध्दतीने मनपा व पाेलिसांनादेखील नियाेजन करावे लागत असते. यात गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची डागडुजी, बॅरिकेडिंग, विद्युत व्यवस्था, गणेश मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन, पाेलीस बंदाेबस्त, वाहतुकीचे नियाेजन करावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापाैर जयश्री महाजन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप आदी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन यांनी शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत, शिस्तबद्ध व सुनियोजनातून व्हावे, यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करून बऱ्याच विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले. महापालिकेची यात असणाऱ्या जबाबदारीच्या अनुषंगाने लवकरच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात नियोजन केले जाईल, असे सांगितले. तर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गाची आम्ही पाहणी केली त्यासंदर्भात विविध विषयांवर नियाेजन केले जाणार असल्याचे सांगितले. महापौरांनी शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.