मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ मंडळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST2021-09-23T04:20:21+5:302021-09-23T04:20:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी बुधवारी (दि. २२) भुसावळ विभागात दौऱ्यावर आले ...

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून भुसावळ मंडळाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी बुधवारी (दि. २२) भुसावळ विभागात दौऱ्यावर आले असता विविध कामांची पाहणी केली. याशिवाय पीओएच शेडला इंजन व्हीलचे निरीक्षण, तसेच ड्यूल मोड लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन केले. फलाट सातवर पाचोरा येथून आले असता माध्यमांना भुसावळ विभागातील विविध प्रगतीवर असलेल्या विषयांवर माहिती दिली.
स्थानकावर केली पाहणी
महाव्यवस्थापक लाहोटी यांनी स्थानकावरील दक्षिणेकडील निरीक्षण करताना गार्ड लॉबी, एसी प्रतीक्षालय याशिवाय नवीन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे निरीक्षण केले. तसेच भुसावळ स्थानकावर इंटरलॉकिंग सिस्टीमवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली
ड्यूल मोड लोकोमोटीव इंजिनचे केले उद्घाटन
पीओएच शेडला इंजिन व्हीलचे निरीक्षण केल्यानंतर ड्यूल मोड लोकोमोटिव्ह इंजन व मंडळ डाटा ट्रेनिंगचेही उद्घाटन केले.
स्टेशन रोड ही तर पालिकेची जबाबदारी
हायटेक भुसावळ स्थानकापर्यंत जाण्यासाठी ज्या स्टेशन रोडचा वापर केला जातो त्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती रेल्वे हद्दीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनच करीत होती; मात्र अचानक आता रेल्वे प्रशासनाने भूमिका बदलली असून, याची जबाबदारी पालिका पाहील असे सांगत हात वर केले.
पाचोरा जामनेर पीजीचा रेल्वेचा सर्व्हे झाला असून, त्याचे इस्टिमेट तयार होत असून, हा रिपोर्ट येत्या जानेवारीपर्यंत रेल्वे बोर्डाकडे दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच चाळीसगाव -औरंगाबाद सर्व्हे झाला असून, येत्या मार्चपर्यंत याबाबतचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले
वर्षभरात भुसावळ विभागात येणाऱ्या गाड्यांची वाढणार स्पीड
इगतपुरी-भुसावळ, भुसावळ-बडनेरा, तसेच भुसावळ-खंडवा या मार्गावर गाड्यांच्या स्पीडबाबत कार्य प्रगतिपथावर आहे. सद्य:स्थितीत ताशी ११० कि.मी. गाड्यांचे स्पीड असून, येत्या वर्षभरात यात ताशी १२० कि.मी.पर्यंत वाढ होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पॅसेंजर गाड्या राज्य शासनाच्या निर्देशानंतर होणार सुरू
भुसावळ विभागातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच आहे. मात्र, वेस्टर्न रेल्वेकडून भुसावळ येथे येणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता राज्य शासनाच्या निर्देशानंतरच पॅसेंजर गाड्यांना सुरुवात करण्यात येईल. ज्या नागरिकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले व १४ दिवस वर झाले असतील, त्यात प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये परवानगी देण्यात येईल.
याशिवाय भुसावळ -जळगाव तिसऱ्या व चौथ्या लाईनचे कार्य प्रगतिपथावर आहे. तसेच जळगाव- पाचोरा तिसऱ्या लाईनचे निरीक्षण या दौऱ्यावर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत डीआरएम एस. एस. केडिया, एडीआरएम नवीन पाटील, डीसीएम अरुणकुमार, वरिष्ठ मंडल परिवहन प्रबंधक आर. के. शर्मा, स्टेशन निर्देशक जी. आर. अय्यर, तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.