कापडी पिशवी युनिट खरेदीची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:26+5:302021-07-10T04:13:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास मंडळ यांच्याकडून कापडी पिशवी युनिट खरेदी केलेल्या साहित्याबाबत ...

कापडी पिशवी युनिट खरेदीची चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मानव विकास कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास मंडळ यांच्याकडून कापडी पिशवी युनिट खरेदी केलेल्या साहित्याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चौकशी आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर लगेचच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. समितीने तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांच्यासोबत चिंचखेडा, ता. जामनेर येथे गुरुवारी पाहणी केली. त्यात काही बाबींमध्ये अनियमितता आढळून आली असल्याचे तक्रारदार गुप्ता यांचे म्हणणे आहे.
यासाठी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी दिले आहेत. त्यात प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन यांनी नेमून दिलेला एक तज्ज्ञ प्रतिनिधी, तसेच जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील लेखाधिकारी यांची समिती नेमण्यात आली. त्या समिती सदस्यांनी गुप्ता यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाभार्थींना मिळालेल्या साहित्याचे स्पॉट व्हेरिफिकेशन करून तांत्रिक आणि इतर अनुषंगिक, तसेच जीईएम पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया व खर्चाच्या बाबी नुकत्याच तपासल्या. त्यानंतर त्यांनी आपला स्थळ निरीक्षण अहवाल तपासला. यात मशिनच्या ब्लेड साईज ज्या प्रमाणे हव्या होत्या, त्याप्रमाणे नाही. तसेच मशिन्स या लॅब टेस्टेट नाही आणि त्यांचे बॅच नंबर आणि वॉरंटी कार्ड देखील नसल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. याबाबत खडके, ता. एरंडोल आणि मुक्ताईनगर तालुक्यात देखील कापडी पिशवी तयार करण्याचे युनिट देण्यात आले आहे. त्यांचीही पाहणी लवकरच या समितीकडून केली जाणार आहे.