आराखडा न घेता मंजूरी देणाऱ्या ‘त्या’ शहर अभियंत्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:43+5:302021-02-05T06:01:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘महानेट’ च्या कामासाठी आराखडा न ...

आराखडा न घेता मंजूरी देणाऱ्या ‘त्या’ शहर अभियंत्याची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘महानेट’ च्या कामासाठी आराखडा न घेताच मंजूरी देणाऱ्या मनपाच्या ‘त्या’ सेवानिवृत्त शहर अभियंत्याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे. तसेच महानेटचे काम करत असलेल्या कंपनीवर देखील शहरातील रस्ते मनपाची परवानगी न घेताच फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचीही मागणी नाईक यांनी केली आहे. याबाबत नाईक यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
मनपाच्या सेवानिवृत्त शहर अभियंत्यांनी महानेटच्या कामासाठी सहा महिन्यांसाठी परवानगी दिल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ ने ३१ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिध्द केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत,शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. नाईक यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक रस्ते अमृत च्या कामांमुळे फुटले आहेत. त्यामुळे खराब रस्त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यातच शासकीय कार्यालयासाठी महानेट चे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात बहुसंख्य भागात पोलची उभारणी केली आहे. ‘महानेट’च्या या कामाला मनपाच्या सेवानिवृत्त शहर अभियंत्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ‘महानेट’ कडून होणाऱ्या या कामासाठी कोणताही आराखडा न घेताच तब्बल सहा महिन्यांचा परवानगी दिली होती. त्यामुळे शहरात तब्बल १९० ठिकाणी खोदकाम करण्यात आले. अनेक भागात तर स्थानिक नागरिकांच्या घरासमोर पोल लावताना स्थानिकांचीही परवानगी घेतली नसल्याचा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली आहे.