बेसुमार गर्दी, सुरक्षित अंतराचा फज्जा तिसऱ्या लाटेसाठी पोषकच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:51+5:302021-06-22T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : अनलॉकमधील ढिलाई, प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष याबरोबरच बेसुमार होणारी गर्दी, सुरक्षित अंतराला ठेंगा, मास्क वापरण्याविषयी ...

बेसुमार गर्दी, सुरक्षित अंतराचा फज्जा तिसऱ्या लाटेसाठी पोषकच !
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : अनलॉकमधील ढिलाई, प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष याबरोबरच बेसुमार होणारी गर्दी, सुरक्षित अंतराला ठेंगा, मास्क वापरण्याविषयी उदासीनता आदी कारणांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अलर्ट तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुले ‘टार्गेट’ होऊ शकतात. मात्र विवाह समारंभ, सभांवरील निर्बंध आणि शाळांची टाळेबंदी कायम ठेवल्यास तिसरी लाट येणारच नाही, असाही सूर व्यक्त झाला.
‘लोकमत’ने सोमवारी डॉक्टरांशी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी संवाद साधला. तिसऱ्या लाटेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसोबतच खबरदारीचीही झाडाझडती घेतली.
चौकट
लाट आणणे आणि थांबवणे आपल्याच हाती
पहिल्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये बहुतांशी निर्बंध हटवले गेले. बाजार व सार्वजनिक सोहळे गजबजून गेले. याचा थेट परिणाम गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यानंतर दिसून आला. कोरोनाबाधितांच्या संख्येने अनपेक्षित उसळी घेतली. दुसऱ्या लाटेवर असे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे कोरोनाची लाट आणणे किंवा थांबवणे आपल्याच हाती आहे, असे निरीक्षणदेखील डॉक्टरांनी नोंदविले आहे.
१. तिसऱ्या लाटेत पालकांच्या संक्रमणातूनच मुलांपर्यंत कोरोना पोहचू शकतो. आता पावसाळा सुरू झाल्याने अन्य साथरोगही पसरतात. अशावेळी लहान मुलांना फ्लूची लस देणे योग्य होईल. पालकांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे.
२. लग्नसमारंभ, सभांवर कडक निर्बंध आणि शाळांची टाळेबंदी पुढील वर्षभर तरी कायम असावी, असाही सल्ला डॉक्टरांच्या चर्चेतून पुढे आला आहे.
३. दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधितांचे मोठे प्रमाण पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असेही मत व्यक्त झाले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे.
तिसऱ्या लाटेची शक्यता कमी; पण..
जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधितांचा उद्रेक पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण विवाहसोहळे, सभा-बैठकांना होणारी गर्दी तिसरी लाट घेऊन येऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षभर तरी शाळांची टाळेबंदी कायम ठेवावी. याबरोबरच विवाह सोहळे, सभांवरील निर्बंधही कायम ठेवावेत. जिथे दुसऱ्या लाटेची तीव्रता जाणवली नाही, तिथे तिसरी लाट रौद्र असेल.
- डॉ. राहुलदेव वाघ, एम.डी. चाळीसगाव
लहान मुले होऊ शकतात टार्गेट
१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण वेगाने करावे. पहिल्या व दुसऱ्या लाटेपासून लांब असणारी लहान मुले तिसऱ्या लाटेत पालकांपासूनच बाधित होण्याचा धोका अधिक आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही आहाराबाबत काळजी घ्यावी. पावसाळा सुरू झाल्याने अन्य साथरोगही बळावू शकतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांचे लसीकरण करून घ्यावे.
-डॉ. गिरीश मुंदडा,
बालरोग तज्ज्ञ, चाळीसगाव
गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी
रुग्णसंख्या कमी झाली आहे.
सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसाला दोन ते तीन रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र बाजारात होणारी गर्दी, सुरक्षित अंतर न पाळणे, सार्वजनिक कार्यक्रमांना उसळणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते. दुसरी लाट याच चुकांमुळे आली होती. हे लक्षात घेतले पाहिजे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियोजन व्हायला हवे.
-डॉ. नरेंद्र राजपूत, एम.डी., चाळीसगाव
आचारसंहिता पाळली पाहिजे
सुरक्षेसाठी फ्लूची लस घ्यावी.
लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र त्यांना कोरोना संक्रमण हे घरातील प्रौढ व्यक्तींकडूनच होऊ शकते. यासाठी नागरिकांनीच कोरोनाला प्रतिरोध करणारी आचारसंहिता पाळली पाहिजे. फ्लू आणि कोरोना यांची लक्षणे काहीअंशी सारखीच आहेत. पावसाळाही सुरू झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना फ्लूची लस देणे योग्य होईल. बाळांचे नियमित लसीकरणही आवश्यक आहे.
-डॉ.सौरभ अरकडी, बालरोगतज्ज्ञ, चाळीसगाव
लहान मुलांसाठी २० बेडची सज्जता
शाळा बंद असल्याने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका हा गर्दीपासूनच आहे. तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला असून, २० बेडही सज्ज केले आहे. लवकरच बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर, मास्क वापरावे. सद्य:स्थितीत ४२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. म्हणून एकदम घाबरण्याचेही कारण नाही.
- डॉ. मंदार करंबेळकर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव
महत्त्वाची चौकट
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
संभाव्य तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून तालुका आरोग्य विभागाने उपाययोजना सज्ज ठेवल्या आहे. पाच आयसीयू बेड तर २० ऑक्सिजन व २० इतर असे ४५ बेड खास तिसऱ्या लाटेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. कोरोना उपचार केंद्रात १०० बेडची व्यवस्था आहे. औषधी व इतर साधनांबाबतही खबरदारी घेतली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रिपोर्टकार्ड
कोरोनाचे एकूण रुग्ण - ९३५९
बरे झालेले- ९३५९
मृत्यू- १२२
एकूण ॲक्टिव्ह रुग्ण - २७६
कोरोना प्रतिबंधक लसीकरण- ४५ हजार
लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट - साडेतीन लाख