जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक शिक्षकांवर अन्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:29+5:302021-09-05T04:20:29+5:30
विनायक वाडेकर मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील ...

जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक शिक्षकांवर अन्याय !
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांना आदर्श पुरस्कार वितरित केला जातो. जिल्ह्यात केवळ जिल्हा परिषद शाळांना ही योजना लागू आहे. तर गेल्या दहा वर्षांपासून माध्यमिकसाठी ही योजना बंद असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक हे आदर्श नसतात काय? माध्यमिक शिक्षकांचे मूल्यमापन करण्यास जिल्हा परिषद असमर्थ ठरत आहे का? माध्यमिक शिक्षकांसाठी ही योजना का लागू नाही ? असा सवाल जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक करीत आहेत. एकप्रकारे हा माध्यमिक शिक्षकांवर अन्याय असल्याचीच भावना अनेक शिक्षकांनी बोलून दाखवली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षकांमधूनच पुढे जाऊन राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार योजना ही सुरू केलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक या दोन्ही गटातील शिक्षकांना हे पुरस्कार दिले जात होते; मात्र गेल्या दहा वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेने केवळ जिल्हा परिषद शिक्षकांसाठीच ही योजना राबवली असून माध्यमिक शिक्षकांसाठीची आदर्श पुरस्कार योजना ही बंद केलेली आहे.
आदर्श पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र समिती असावी
जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाला स्वतः विविध राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचे खेटे घ्यावे लागतात.त्यांच्या मागे फिरून त्यांच्या शिफारसी व सह्या घ्याव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारचा प्रस्ताव तयार करून त्यावर वेगवेगळ्या लोकांच्या शिफारसी घ्याव्या लागतात, एका आदर्श व्यक्तीला अशा विविध लोकांकडून जर शिफारसी घ्याव्या लागत असतील तर तो एक प्रकारे आदर्श व्यक्तिमत्त्वाचा अपमानच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे दर वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीसाठी एक अशी समिती नेमणे गरजेचे आहे की जी समिती वर्षभर कोणत्या शिक्षकाचे कार्य चांगले आहे याचा आढावा घेत अशा शिक्षकांची निवड करायला हवी. या समितीत निवृत्त मुख्याध्यापक किंवा गतकाळातील आदर्श शिक्षक किंवा आदर्श मुख्याध्यापक असायला हवे, अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषद प्रशासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार हा माध्यमिक व प्राथमिक अशा दोन्ही विभागांसाठी दिला पाहिजे. मी या समितीवर जिल्हा परिषद सदस्य असताना दोन्ही विभागासाठी पुरस्कार दिले जात होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी आम्ही एक विशिष्ट अशी समिती गठीत केलेली होती व त्या समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करत होतो.
-एस. ए. भोई (अध्यक्ष ज्ञानोदय मंडळ तथा शिक्षण तज्ज्ञ,अंतुर्ली)
माध्यमिक शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उपक्रमशील शिक्षक असून माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार न मिळणे हा जिल्हा परिषदेकडून एक प्रकारे अन्यायच होत आहे.
-संदीप पाटील (मुख्याध्यापक, आश्रम शाळा चारठाणा)
जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच माध्यमिक शिक्षकांच्या कार्याचे देखील मूल्यमापन करावे. जेणेकरून उपक्रमशील माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देता येतील. माध्यमिक व प्राथमिक हे दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच येतात.
- आर. पी. पाटील (अध्यक्ष, तालुका मुख्याध्यापक संघ मुक्ताईनगर)