India to overtake China in electronics manufacturing: Seminar in Bhusawal | इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार-भुसावळात चर्चासत्र

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार-भुसावळात चर्चासत्र

ठळक मुद्देप्रत्यक्ष रोजगारात महिला अभियंत्यांना प्राधान्य -डॉ.नीता नेमाडेविविध वक्त्यांनी केले मार्गदर्शन

भुसावळ : जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल, टीव्ही कंपन्या येत्या वर्षांत देशात येणार आहे आणि लवकरच भारत या विभागात चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाइल फोनची निर्मिती या क्षेत्राला पहिल्या क्रमांकाचे क्षेत्र बनविण्यासाठी भावी अभियंत्यांनी सज्ज रहावे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नीता नेमाडे यांनी केले.
श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातर्फे आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
देशांतर्गत २२ आणि १० आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या वर्षांत देशात सुमारे ११.५ लाख कोटींच्या मोबाइल फोनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे १५ लाख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या अभियंत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष रोजगार मिळवण्याच्या शर्यतीत महिला अभियंत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे यासाठी त्यांना मार्गदर्शक सूचना या चर्चासत्रात देण्यात आल्या.
नामांकित कंपन्या बाजारपेठेत येणार : प्रा.स्मिता चौधरी
जगातील अव्वल उत्पादन कंपन्या भारतात येतील ज्या फक्त भारतासाठीच नाही तर जागतिक बाजारपेठांसाठीही उत्पादन करतील. कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांमध्ये रोजगाराबाबतही एक दिलासादायक बाब ठरणार आहे. पुढील दोन-तीन वर्षांत केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सर्वात मोठी महासत्ता असेल. भावी अभियंत्यांनासुद्धा याचा फायदा होईल, असे मत प्रा.स्मिता चौधरी यांनी व्यक्त केले.
आत्मनिर्भर भारत योजना संधी देणारी : डॉ.गिरीश कुळकर्णी
आत्मनिर्भर भारत योजना भावी अभियंत्यांसाठी प्रचंड संधी निर्माण करणारी आहे. आधी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत सक्षम नव्हता आता ती संधी चालून आली आहे. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमच्या माध्यमातून देशसेवेत सहभाग करण्याच्या वाटा उपलब्ध झाल्या असून त्यांनी या शिक्षण प्रणालीचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे मत विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी यांनी चर्चासत्राचे समारोप करताना मांडले.
प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.डॉ.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.धीरज पाटील, प्रा.दीपक साकळे, प्रा.नीलेश निर्मल, प्रा.दीपक खडसे यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: India to overtake China in electronics manufacturing: Seminar in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.