जळगाव- जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढत जात असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. वाढत जाणारे शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे नद्या-नाले व हवेतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ४ साखर कारखाने, १ औष्णिक प्रकल्प व इतर लहान मोठे प्रकल्प आहेत. यासह जळगाव शहरासह तालुक्याच्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात केमिकल व इतर कंपन्या वाढत आहे. यामुळे हवेतील प्रदूषण यासह नद्यांमधील प्रदूषणदेखील वाढत जात आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जैवविविधतेवर होताना दिसून येत आहे.
जळगाव शहरात धूलिकणांचे प्रमाण वाढले
जळगाव शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे धूलिकण यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात जळगाव शहरातील धूलिकणांचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी वाढले आहे. २०१७ मध्ये शहरातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण हे ५५ ते ६० टक्के इतके होते. आज ते प्रमाण ९० ते ९५ टक्के इतके झाले आहे. तसेच वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण देखील वाढत जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम जाणवत आहेत. जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गिरणा व तापी नद्याही झाल्या प्रदूषित
जळगाव जिल्ह्यात गिरणा व तापी या दोन नद्या प्रमुख असून या दोन नद्यांच्या काठी जिल्ह्यातील ७० टक्के सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मात्र, जळगाव शहरातील ७० टक्के सांडपाणी हे गिरणात सोडले जात असल्याने ही नदी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. यासह जळगाव शहरातील एमआयडीसीचे सर्व दूषित पाणी हे तापी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये या दोन्ही नद्यांमधील जलचरांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. जलचर अभ्यासक राहुल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तापी व गिरणा नदीमधील अनेक मासे त्याच्या जेनेटिक्स बदल होत आहेत. तसेच अनेक दुर्लभ प्रजाती नष्ट होत जात आहे.
कोट..
जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण व शहरीकरण होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावरदेखील होत आहे. जळगाव शहरात एका योजनेमुळे धूलिकणांचे संख्येत वाढ झाली आहे, तर प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढले आहे.
- डॉ. नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ