इम्युनिटी वाढविण्यासाठी गुळवेल, अश्वगंधा, पुदिना, आदी रोपांची वाढतेय मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:07+5:302021-05-06T04:17:07+5:30
जळगाव : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये नागरिक योग्य ती काळजी घेत असताना दुसरीकडे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही प्रयत्न ...

इम्युनिटी वाढविण्यासाठी गुळवेल, अश्वगंधा, पुदिना, आदी रोपांची वाढतेय मागणी
जळगाव : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये नागरिक योग्य ती काळजी घेत असताना दुसरीकडे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही प्रयत्न करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गुळवेल, अश्वगंधा, पुदिना, तुळस या रोपांचा काढा व त्यांच्या भाज्यांचा आहारात समावेश करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक अधिकच जागरूक होत आहे. कोरोना संसर्गामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने नागरिक रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय करताना दिसून येत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे पुरातन काळापासून सांगण्यात येत असलेल्या औषधी वनस्पतींचा नागरिक वापर करताना दिसून येत आहेत. यामध्ये गुळवेल या वनस्पतीला मागणी असल्याचे काही नर्सरीचालकांनी सांगितले. या वनस्पतीचा काही नागरिक काढा करून पितात, तर काही नागरिक भाजीदेखील करतात, तर काही नागरिक या वनस्पतीचा कच्चा पालाही खातात. या वनस्पतीपासून शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढत असून, शरीराच्या इतर अवयवांनाही मजबूत करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच अडुळसा ही वनस्पती खोकल्यासाठी अत्यंत उपयोगी असून, या वनस्पतीचा काढा मोठ्या प्रमाणावर नागरिक घेत असल्याचे सांगण्यात आले.
या पाच रोपांना वाढतेय मागणी
१) गुळवेल : या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. शरीराच्या सर्व व्याधींवर ही वनस्पती उपयोगी आहे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ही वनस्पती बहुगुणी मानली जाते. तसेच अशक्तपणा, कावीळ, मूळव्याध, संधिवात या व्याधींमध्येही वनस्पतीचा उपयोग केला जात आहे.
२) अश्वगंधा : ही वनस्पती रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. तसेच बारीक आणि जुनाट आजारही नष्ट करण्यास मदत करते. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक नित्यनेमाने या वनस्पतीचा काढा घेत असतात. विशेषतः हिवाळ्यात या वनस्पतीला सर्वाधिक मागणी राहत असल्याचे सांगण्यात आले.
३) तुळस : प्रत्येक घराच्या बाल्कनीत असणाऱ्या तुळस या वनस्पतीचा सध्याच्या कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर वापर वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यावर अनेक नागरिक तुळशीच्या पानांचा काढा करून पितात, तर चहामध्येही तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो. तसेच हृदयरोग, लठ्ठपणा, त्वचारोग यासह इतर प्रकारच्या जुनाट आजारांवरही तुळशीचा उपयोग केला जातो.
४) अडुळसा : इतर वनस्पतींप्रमाणे ही वनस्पतीदेखील अत्यंत उपयोगी असून, खोकला, श्वसन विकार, अंगदुखी, आदी व्याधींवर अडुळसाच्या काढ्याचा खूप वापर केला जातो. खोकल्यासाठी या वनस्पतीचे औषध अंत्यत उपयोगी सांगण्यात आले आहे. या वनस्पतीच्या पानांचे नुसते सेवन केले तरी खोकल्यापासून आराम मिळत असल्याचे सांगण्यात आले.
५) पुदिना : ही वनस्पती अपचन, आम्लपित्त, पोटदुखीचा त्रास या व्याधींवर उपयोगी वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे पचनशक्ती सुधारते. तसेच सर्दी-खोकला व ताप यांचा त्रास जाणवत असल्यास या वनस्पतीच्या काढ्याचाही नागरिक उपयोग करतात. पुदिन्यामध्ये अ, क व ई जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी या पुदिन्याचा नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीत नागरिक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेले दिसून येत आहेत. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक गुळवेल, पुदिना, अशवंगधा या वनस्पतीच्या रोपांची खरेदी करायला येत आहेत.
- अनिल यादव, नर्सरी चालक
वनस्पतींच्या गुणधर्माबाबत ज्या नागरिकांना माहीत आहे, ते नागरिक अशवंगधा, पुदिना, अडुळसा, गुळवेल या रोपांची मागणी करीत आहेत. काही नागरिक या रोपांची औषधे मेडिकलमधूनही घेतात, तर काही नागरिक नर्सरीतून रोपे घेतात. एकंदरीत आता काही ग्राहक या वनस्पतींच्या रोपांची मागणी करत आहेत.
- सुरेश चौधरी, नर्सरीचालक