बहादरपूर येथे स्त्रीधन निधी बँकेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST2021-08-21T04:22:00+5:302021-08-21T04:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : महिलांना आर्थिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी मिर्च मसाला स्वावलंबन योजनेच्या श्री गणेशासह महाराष्ट्रभर ...

बहादरपूर येथे स्त्रीधन निधी बँकेचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : महिलांना आर्थिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी मिर्च मसाला स्वावलंबन योजनेच्या श्री गणेशासह महाराष्ट्रभर महिलांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या पहिल्या स्त्रीधन निधी बँकेचे बहादरपूर, ता. पारोळा येथे ज्यांनी २० वर्षांपूर्वी बचत गट स्थापन करून या कार्याची सुरुवात केली, त्या महिलांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
२० ऑगस्ट २०१२ रोजी श्री गजानन महाराज शेगाव संस्थानाचे व्यवस्थापकीय संस्थापक कै. शिवशंकर पाटील यांनी बहादरपूर येथे प्रत्यक्ष येऊन संस्थेस भेट दिली होती. तेव्हापासून २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी चैतन्य दिन म्हणून संस्थेत साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून २० ऑगस्ट २०२१ रोजी स्त्रीधन निधी लिमिटेड कंपनी आणि मिर्च मसाला प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा बहादरपूर येथील सर्वप्रथम स्थापित झालेले महिला बचत गट श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, भवानीनगर महिला बचत गट यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
यावेळी ज्या महिलांनी बहिणा ब्रॅण्डचे उत्पादन खरेदी केले, त्यांना मिळालेल्या नफ्यातून स्त्रीधन निधी लिमिटेड बँकेचे शेअर्सदेखील नीलिमा मिश्रा, वैशाली पाटील, सरिता चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बहादरपूर, शिरसोदे, महालपूर व परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना भगिनी निवेदिता संस्थेच्या अध्यक्षा तसेच स्त्रीधन निधी लिमिटेडच्या संचालिका नीलिमा मिश्रा यांनी केली. त्यांनी मिर्च मसाला प्रकल्पाची संकल्पना सर्वांसमोर विस्तृतपणे मांडली. स्त्रीधन निधी लिमिटेड कंपनीच्या संचालिका सरिता चौधरी आणि वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.