जामनेरला जबरी चोरी, चोरट्यांनी केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 15:22 IST2023-04-02T15:21:19+5:302023-04-02T15:22:01+5:30
या घटनेने शहराबाहेर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामनेरला जबरी चोरी, चोरट्यांनी केली मारहाण
मोहन सारस्वत, जामनेर, जि. जळगाव : शहरातील वर्धमान नगरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी घरात घुसून एकास पायावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर त्यांच्या पत्नीचे दागिने लांबवले.
वसंत शंकर चव्हाण यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या दोघांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला. वरच्या मजल्यावरील खोलीचा व शेजाऱ्यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. वसंत चव्हाण यांच्या पाय व डोक्यावर रॉडने मारहाण करून जखमी केले. पत्नी कलाबाई यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची पोत व कानातील दागिने हिसकावून चोरटे पसार झाले.
वसंत चव्हाण यांना रात्रीच उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कलाबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. तपासासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली. या घटनेने शहराबाहेर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"