जळगाव: कोरोना संकटामुळे अनेक लग्नसोहळे लांबणीवर पडले. तर अनेकांना कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत लगीनगाठ बांधावी लागली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं विवाह सोहळे थाटामाटात संपन्न होत आहेत. जळगावात मात्र एका तरुणानं लग्न जुळत नसल्यानं आत्महत्या केली आहे. तिशी उलटून गेल्यानंतरही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं.
जळगावातल्या नशिराबाद गावात वास्तव्यास असलेल्य चेतन खरोटेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्न होत नसल्यानं काही दिवसांपासून तो चिंताग्रस्त होता. त्यानं आपली खंत मित्रांकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे तो व्यसनाच्या आहारीदेखील गेला. चिंतेत असलेल्या चेतननं आत्महत्या करून जीवनप्रवास संपवला.
लग्न होत नसल्यानं चेतन नाराज होता. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यानं आईकडे नाराजी बोलून दाखवली. तो व्यवसाच्या जास्त आहारी गेला होता. त्यामुळे चेतनची आई नातेवाईकांकडे निघून गेली होती. आई निघून गेल्यानंतर चेतननं गळफास घेऊन आत्महत्या केली. चेतन बराच वेळ घराबाहेर न आल्यानं त्याच्या शेजाऱ्यांना संशय आला. घराचं दार तोडताच चेतन मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.