दापोरा येथे अवैध वाळू उपसा थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:53+5:302021-08-21T04:20:53+5:30
दापोरा, ता. जळगाव : दापोरा येथे कोणताही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नसताना गिरणा नदीपात्रात भरदिवसा व रात्रीच्या वेळी ...

दापोरा येथे अवैध वाळू उपसा थांबेना
दापोरा, ता. जळगाव : दापोरा येथे कोणताही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नसताना गिरणा नदीपात्रात भरदिवसा व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दापोरा नदीपात्रात जेमतेम वाळू साठा शिल्लक असल्याने ग्रामस्थांकडून वाळू उपसा थांबणेसाठी विरोध केला जातो; मात्र परिसरातील वाहनधारक मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत आहेत. रात्रीवेळी तसेच दिवसादेखील वाहनाचे जत्रेचे स्वरूप नदीपात्रात आले असते; मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महिनाभरापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा उत आला आहे. यामुळे गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. सर्व परिसरात बागायती क्षेत्र असल्याने पाण्याची पातळी वाळूमुळे टिकून राहते, असाच वाळूचा उपसा सुरू असला तर भविष्यात नदीपात्रात पाणी राहणे कठीण होईल.
भरवेगात वाहने जात असल्याने अपघात होण्याची भीती
गिरणा नदीपात्रातून येणारी वाहने भरधाव वेगात मराठी शाळेजवळून गावातून जातात, यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असूनदेखील प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये काही साटेलोटे तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.
ग्रामदक्षता समिती नावापुरतीच
दापोरा येथील गिरणा नदीपात्राचा कोणताही वाळू ठेका झालेला नाही; मात्र तरीही सुसाट अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाने सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामदक्षता समितीची स्थापना केली आहे; मात्र समितीचे पदाधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्राम दक्षता समिती फक्त नावापुरतीच आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.