फैजपूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:37 IST2019-12-14T23:35:37+5:302019-12-14T23:37:34+5:30
भरधाव वेगाने जाणारा गुरांचा ट्रक पोलिसांना माहिती मिळताच पकडला.

फैजपूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : भरधाव वेगाने जाणारा गुरांचा ट्रक शहरातील सुभाष चौकात पोलिसांना माहिती मिळताच पकडला. यातील ट्रक चालक हा ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी गुरांचा ट्रक वडोढा येथील आश्रमात रवाना केला. त्यात दोन गुरे मयत तर १८ कोंबलेल्या स्थितीत जिवंत आढळून आली.
रावेरकडून भरधाव वेगाने अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ट्रकला रावेर व सावदा येथेसुद्धा अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र ट्रक भरधाव असल्याने तो हाती लागला नाही. मात्र फैजपूर पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे व सहका-यांनी सदरचा ट्रक हा सुभाष चौकात अडविला. ट्रक पकडताच चालक हा फरार झाला. पोलिसांनी तातडीने हा ट्रक वडोढा येथील आश्रमात रवाना केला व यातील गुरांची सुटका केली. त्यात दोन गुरे ही मयत झाली होती तर १८ ही कोंबलेल्या स्थितीत जिवंत आढळून आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.